तेव्हा मोदीही घरूनच काम करत होते, उद्धव ठाकरेंचा जबरदस्त टोला

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींवर अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयाबाबतच्या सरकारच्या हाताळणीवर टीका केली. तेव्हा मोदींनीही घरूनच काम केले होते, असा टोला त्यांनी लगावला. ठाकरे यांनी या संकटाबाबत देशाला विश्वासात घेण्याची गरज अधोरेखित केली.

तेव्हा मोदीही घरूनच काम करत होते, उद्धव ठाकरेंचा जबरदस्त टोला
uddhav thackeray pm narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 03, 2025 | 2:13 PM

“महाविकासआघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घराबाहेर पडले नाहीत”, अशी टीका भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून वारंवार केली जाते. “कोरोनाकाळात आम्ही पीपीई किट घालून फिरत होतो आणि उद्धव ठाकरे घरात बसून नोटा मोजत होते”, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली होती. आता ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. तेव्हा मोदीही घरूनच काम करत होते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. त्यासोबतच उद्धव ठाकरेंनी ऑटो टॅरिफवरही भाष्य केले.

दुष्परिणाम काय होईल याचा विचार करायला हवा होता

साधारण एक महिना पंधरा दिवस आधी. ट्रम्पने इशारा दिला होता. भारताने कर कमी करावे. नाही तर आम्ही जशास तसे कर लावू. त्यांनी कालपासून लागू केले. सेन्सेक्सची पडझड होते. मला अपेक्षा होती की देशाच्या ताठकण्याचा हा विषय आहे. देशावर आर्थिक संकट कोसळेल की काय, देशाचा पाठकणा मोडेल की काय अशी परिस्थिती असताना पंतप्रधान, अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्याने बाकीचे सर्व विषय बाजूला ठेवून देशाला विश्वासात घ्यायला हवं होतं. आपण काय केलं तर दुष्परिणाम काय होईल याचा विचार करायला हवा होता, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

आपण पाकिस्तानला इशारा देऊ शकतो, अमेरिकेला नाही

“मी मुख्यमंत्री असताना चीन अरुणाचल प्रदेशात घुसला होता. तेव्हा मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली होती. तेव्हा मोदीही घरूनच काम करत होते. देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी संवाद साधला होता. सर्वांना मोदींनी विश्वासात घेतलं होतं. सर्व मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. तुम्ही देशाच्या हिताचे निर्णय घ्याल. आमचा तुम्हाला पाठिंबा असेल, असं सर्व मुख्यमंत्र्यांनी मोदींना सांगितलं. तसंच या टॅरिफच्या संकटाबाबत त्यांनी सांगितलं असतं देशाला विश्वासात घेतलं असतं. तर बरं झालं असतं. एकमुखाने एका क्षणाचाही विचार न करता त्यांना पाठिंबा दिला असता. पण तसं झालं नाही. पण त्याकडे दुर्लक्ष झालं. आपण पाकिस्तानला इशारा देऊ शकतो. चीनला देऊ शकत नाही. अमेरिकेला तर नाहीच नाही. मग काय करायचं तर जे सुरू आहे ते भोगतोय. ते भोगत बसायचं. हे आपल्याला कळू द्यायचं नाही. कुठे तरी वेगळे विषय काढायचे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकसभेत सर्व विषय बाजूला ठेवून चर्चा

“आजतरी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेत सर्व विषय बाजूला ठेवून चर्चा करावी. पंतप्रधान परदेशात गेले. अर्थमंत्री कुठे माहीत नाही. परराष्ट्र मंत्रीही नाही. या सर्वांनी शासकीय भाषेत देशाला अवगत केलं पाहिजे. या संकटावर बोललं पाहिजे”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.