
गेल्या काही काळापासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. अशातच आता जळगावातील एका धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. जळगावात सात ते आठ जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तुषार चंद्रकांत तायडे असे 19 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे, तो जळगावातील समता नगर परिसरातील रहिवासी आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार तुषार चंद्रकांत तायडे हा तरूण त्याच्या आजीवर अंत्यसंस्कार करून यावल तालुक्यातून दुचाकीने परत येत होते. याच दरम्यान रस्त्यात सात ते आठ जण चारचाकीतून आले आणि त्याला घेऊन गेले. त्यानंतर यावल बोरावल रोडवर त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तुषार तायडे गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे तुषारचा पहाटे 1 वाजता मृत्यू झाला. या घटनेमुळे समता नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या तरुणाने आरोपीविरुद्ध महिनाभरापूर्वी instagram वर एक व्हिडिओ केला होता, या कारणावरून त्याला बेदम मारहाण झाली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मारहाण करणारे राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे यांच्यासह सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीसांची पथके रवाना झाली असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींना अटक झाल्यानंतर या हत्येमागील खरे कारण समोर येणार आहे.
तुषार चंद्रकांत तायडे याच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी रस्ता आंदोलन केले. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. आरोपींना आमच्या ताब्यात द्या अशी मागणीही नातेवाईकांकडून करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर पाऊण तासानंतर आंदोलन मागे घेत नातेवाईकांनी तरुणाच्या मृतदेह ताब्यात घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.