अखेर संभ्रम दूर, माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, थेट राज्यपालांकडे… मोठी नवी अपडेट..

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात कोकाटे यांनी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. माणिकराव कोकाटे यांचे खाते काढण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती.

अखेर संभ्रम दूर, माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, थेट राज्यपालांकडे… मोठी नवी अपडेट..
Manikrao Kokate
| Updated on: Dec 18, 2025 | 9:27 AM

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आलंय. हेच नाही तर माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.  माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा चेंडू सध्या राज्यपालांकडून असल्याचे सांगितले जातंय. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात कोकाटे यांनी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. त्यानंतर कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. यामुळे कोणत्याही क्षणी त्यांची अटक होऊ शकते. कोकाटे मुंबईतील रूग्णालयात दाखल असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे. कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर ते राजीनामा कधी देणार यावरून चर्चा रंगताना दिसल्या.

सुरूवातीला सांगण्यात आले की, माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवार यांच्याकडे दिला. मात्र, त्यानंतर परत अशी चर्चा सुरू झाली की, माणिकराव कोकाटे यांनी कोणत्याही प्रकारचा राजीनामा दिला नाही. आता संभ्रम दूर झाला असून माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले. सदनिका घोटाळा प्रकरण माणिकराव कोकाटे यांच्या चांगलेच अंगलट आले. कोर्टाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही.

माणिकराव कोकाटे यांचे खाते काढण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती. राज्यपालांनी ही शिफारस मान्य केली. आता कोकाटे आपल्या पदावरून पायउतार झाले आहेत. रिक्त झालेल्या क्रीडा खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. काही दिवस त्यांच्याकडे हे मंत्रिपद असणार आहे.

फक्त पदाचाच कारभार काढून काही होणार नाही तर मंत्रिपदाचाही कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत होती. काही दिवसांपूर्वीही माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद धोक्यात आले होते. मात्र, त्यावेळी त्यांचे खाते बदल करून मंत्रीपद वाचवण्यात आले होते. मात्र, आता शेवटी अजित पवार यांनी कारवाई केली आहे. माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.