धमकी, भीती अन् लैंगिक शोषण…खरातचा सर्वात भयानक चेहरा उघड; SIT च्या माहितीने खळबळ!

अशोक खरात प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. खरात महिलांना कसं फसवायचा, याबाबत सातपुते यांनी सांगितले आहे.

धमकी, भीती अन् लैंगिक शोषण...खरातचा सर्वात भयानक चेहरा उघड; SIT च्या माहितीने खळबळ!
ashok kharat
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 07, 2026 | 5:29 PM

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात याच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना केलेली आहे. भोदू खरातची प्रकरणं समोर आल्यानंतर न थकता या पथकाकडून सर्व प्रकरणांचा कसून तपास केला जात आहे. दरम्यान, आता एसआयटी पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन या तपासात आतापर्यंत काय काय समोर आले? तपास कुठपर्यंत आला आहे? याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एसआयटी एकूण 11 प्रकरणांची चौकशी करत आहे.

११ गुन्हे एसआयटीकडे तपासायला आहेत

तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या माहितीुसार पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी अशोक खरात या गुन्ह्याचा तपास एसआयटी मार्फत करण्याचे आदेश दिले होते. २० मार्च पासूनचे गुन्हे आणि इतर असे ११ गुन्हे एसआयटीकडे तपासायला आहेत. दोन पोलीस उपअधीक्षक तपासात आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षण असे २४ जणांचे पथक आहे.

खरात विरोधात एकूण १२ गुन्हे आहेत

नाशिक आणि नगर जिल्ह्यात खरात विरोधात एकूण १२ गुन्हे आहेत. ९ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. दोन गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस आणि एक नाशिक पोलीस तपास करत आहे. अशोक खरात विरोधात नसलेले पण संबंधित गुन्हेही एसआयटी तपास करत आहे, असेही सातपुते यांनी सांगितले.

श्रद्धेचा गैरफायदा घेत होता, धमकी देत होता

एसआयटीकडे असलेल्या गुन्ह्यांपैकी ८ गुन्हे महिला लैंगिक, तीन गुन्हे फसवणूक, सावकरी आणि अंधश्रद्धेशी संबंधित आहेत. महिला लैंगिक अत्याचाराचे आठ गुन्हे आणि फसवणुकीचा एक गुन्हा असे ९ गुन्हे आहेत. ३० साक्षीदारांकडून तपासणी केली. चौकशीतून आरोपी पीडीत व्यक्तीच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. धमकी देत होता. भीती दाखवत होता, अशी माहिती सातपुते यांनी दिली. तसेच खडे, चिंचोके इत्यादी गोष्टीद्वारे पैसा उकळत होता. महिलांना दैवी शक्ती असल्याचं सांगत होता. कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून, त्यांना बदनामीची धमकी देऊन लैंगिक शोषण करत होता. ईशान्यश्वर मंदिराच्या परिसरात अंधारात दैवी शक्ती असल्याचं भासवून अंधश्रद्धा पसरवत होता, असे तपासातून समोर येत असल्याचेही सातपुते यांनी सांगितले आहे.

Follow Us