32 शिराळ्यात आता पुन्हा दिसणार नाग, सरकारचा मोठा निर्णय

नागपंचमीच्या पूर्वसंधेला शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा 32 शिराळ्यात नाग पाहायला मिळणार आहेत.

32 शिराळ्यात आता पुन्हा दिसणार नाग, सरकारचा मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 28, 2025 | 9:33 PM

शंकर देवकुळे, प्रतिनिधी : मंगळवारी नागपंचमी आहे, नागपंचमीचा सण राज्यभरात उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि केंद्राच्या वन मंत्रालय व वन्यजीव विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नागपंचमीच्या पूर्वसंधेला शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा 32 शिराळ्यात नाग पाहायला मिळणार आहेत. शैक्षणिक अभ्यास व सर्प संवर्धन विषयी पारंपारिक प्रसार करण्यासाठी वन मंत्रालयाकडून ही परवानगी देण्यात आली आहे.

27 जुलै ते 31 जुलैपर्यंत नाग पकडून त्याचा उपयोग शैक्षणिक अभ्यासासाठी आणि प्रसार प्रचारासाठी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,  31 जुलैनंतर पुन्हा जिवंत नाग नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात यावेत असा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान मनोरंजन, खेळ मिरवणूक, व्यवसायिक कामासाठी या नागांचा उपयोग केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी वन विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे. वन विभागाचे अधिकारी सागर गवते यांनी याबाबत माहिती दिली.

नाग पकडण्याची परवानगी ही केवळ 21 जणांनाच देण्यात आली आहे, हे नाग पकडून त्याचा उपयोग शैक्षणिक अभ्याससाठी आणि प्रसार प्रचारासाठी करण्याचे निर्देश आहेत, त्यामुळे जरी नाग पकडण्याची परवानगी देण्यात आली असली तरी देखील गावात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच नागपंचमी साजरी होणार आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नागाची पूजा किंवा मिरवणूक काढण्यात येणार नाहीये. जे नाग पकडण्यात येणार आहेत, त्याचा उपयोग हा फक्त शैक्षणिक अभ्यासासाठी आणि प्रसार प्रचारासाठी करण्यात येणार आहे.

काय आहे प्रथा?  

सांगली जिल्ह्यातल्या 32 शिराळा या गावात पूर्वीपासून एक प्रथा चालत आली आहे, या प्रथेनुसार नागपंचमीच्या दिवशी या गावात नाग पकडे जातात. त्यांची पूजा केली जाते. नाग हे आमचे भाऊ आहेत, असं येथील ग्रामस्थांचं म्हणण आहे. मात्र या प्रथेवर बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे इथे आता दरवर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच नागपंचमी साजरी करण्यात येते, यंदा देखील त्याच पद्धतीने नागपंचमी साजरी करण्यात येणार आहे. मात्र यावर्षी गावातील 21 लोकांना नाग पकडण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्यांचा उपयोग हा  फक्त शैक्षणिक अभ्यासासाठी आणि प्रसार प्रचारासाठी करण्यात येणार आहे. नागाच्या मिरवणुकीवर आणि पुजेवर बंदी कायम आहे.