थोर समाजसेवक स्टॅन स्वामी यांना पाण्याच्या पेल्यासाठी झगडावं लागतं! इतके आपण मुर्दाड झालो आहोत का? – आडम मास्तर

झारखंडमध्ये स्टॅन स्वामी यांनी आदिवासींच्या प्रश्नांसाठी आयुष्य खर्ची घातलं. त्या स्वामी यांना एका पेल्यासाठी आणि प्लास्टिकच्या नळीसाठी झगडावं लागत आहे. इतके का आपण मुर्दाड झालो आहोत का? असा प्रश्न आडम मास्तर यांनी विचारला आहे.

  • रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर
  • Published On - 15:08 PM, 30 Nov 2020

सोलापूर: पुणे इथं पार पडलेल्या एल्गार परिषदेत सहभागी झाल्याच्या कारणावरुन अटक करण्यात आलेले झारखंडमधील समाजसेवक स्टॅन स्वामी यांना तुरुंगात मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. तसा आरोप कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केला आहे. स्वामी यांनी पिण्याच्या पाण्याच्या पेल्यासाठी आणि प्लास्टिकच्या नळीसाठी तुरुंग प्रशासनाला आर्त विनंती करुनही त्यांना ती पुरवली जात नाही. इतके आपण मुर्दाड झालो आहोत का? असा सवाल आडम मास्तर यांनी सरकारला विचारलाय.(Adam Master questions the government about the inconvenience of Stan Swamy)

स्टॅन स्वामी हे सध्या एल्गार परिषद प्रकरणात अटकेत आहेत. सध्या त्यांना तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. स्वामी यांचं वय 83 वर्षे आहे. त्यांना पार्किन्सन नावाचा आजार आहे. त्यामुळे त्यांचे हात थरथर कापतात. पाण्याचा पेलाही त्यांना हातात पकडता येत नाही. त्यामुळे त्यांनी पेला आणि प्लास्टिकच्या नळीची मागणी एका अर्जाद्वारे केली होती. पण तशी नळी देण्यास एनआयएने असमर्थता दर्शवली आहे. त्यावरुन आडम मास्तर यांनी संताप व्यक्त केला आहे.

झारखंडमध्ये स्टॅन स्वामी यांनी आदिवासींच्या प्रश्नांसाठी आयुष्य खर्ची घातलं. त्या स्वामी यांना एका पेल्यासाठी आणि प्लास्टिकच्या नळीसाठी झगडावं लागत आहे. इतके का आपण मुर्दाड झालो आहोत का? असा प्रश्न विचारत आडम मास्तर यांनी राज्य सरकारला यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, तुरुंग प्रशासनासह अनेकांना ईमेलद्वारे पाठवलं आहे.

कोण आहेत स्टॅन स्वामी?

स्टॅन स्वामी हे झारखंडमध्ये गेल्या तीन दशकांपासून सामाजिक कार्यात सहभागी आहेत. तामिळनाडूच्या एका गावात त्यांचा जन्म झाला आहे. भारत आणि फिलिपाईन्स इथल्या काही प्रसिद्ध संस्थांमध्ये समाजशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी बंगळुरुमधील इंडियन सोशल इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं. पुढे त्यांनी झारखंडमध्ये जात तिथल्या आदिवासींच्या प्रश्नावर काम करण्यास सुरुवात केली.

स्टॅन स्वामी यांनी सुरुवातीच्या काळात झारखंडमधील सिंहभूम भागात पाद्री म्हणून काम केलं. पुढे धर्मप्रचारकाचं काम सोडून ते पूर्णवेळ आदिवासींच्या हक्कासाठी लढू लागले. जमीन अधिग्रहण कायद्यातील सुधारणा, वनाधिकार कायदा लागू करण्याबद्दलची सरकारची उदासिनता, आदिवासी हे नक्षलवादी असल्याचं सांगत त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावणं या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी आवाज उठवला आहे.

संबंधित बातम्या: 

मोदी, फडणवीसांचं कौतुक महागात, आडम मास्तरांचं पक्षातून निलंबन

Adam Master questions the government about the inconvenience of Stan Swamy