
Solapur Flood : राज्यात पावसाचा कहर सुरूच असून अनेक जिल्ह्यांत पूरस्थितीचा धोका आणखी वाढला आहे. सोलापुरातील 29 गावांना मोठा फटका बसला आहे. अहिल्यानगर, धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सीना कोळेगाव, चांदणी, खासापुरी प्रकल्प तसंच भोगावती नदीमधून सोडण्यात आलेलं पाणी सोलापूरमधील सीना नदीत आलं. त्यामुळे करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर इथल्या जवळपास 29 गावांतील अनेकांचे संसार पुरात वाहून गेले आहेत. शेतामध्ये पुराचं पाणी शिरलंय, रस्ते जलमय झाले आहेत. सीना नदीला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. एकीकडे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला असताना आता रेल्वे मार्गही प्रभावित झाली आहे. रेल्वे रुळावर पाणी आल्याने एक्स्प्रेस आणि वंदे भारत गाड्या थांबून आहेत.
सोलापूर रेल्वे स्थानकावरच वंदे भारत एक्स्प्रेस थांबून आहे. यासोबतच इतरही तीन एक्स्प्रेस रखडल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोलापुरातल्या माढामधील निमगाव आणि दारफळ या गावांची पाहणी केली. सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. दारफळ, वाकाव, राहुलनगर, उंदरगाव, केवड या गावांना पाण्याने वेढा दिलाय. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिला.
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. दरम्यान हवामान खात्याने 27-28 सप्टेंबरपासून पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेलं कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागासह मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आतापर्यंत सरकारने 2,215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच प्रचलित निकषांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी घोषणा फडणवीसांनी मंगळवारी केली. त्याचप्रमाणे शनिवार आणि रविवार राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाला खबरदारी घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.