रोहित पवारांना अन्नाचा एक घासही देऊ नका, नाटक कशाला करताय? हे काय ‘नटरंग’चं शुटिंग आहे का? गोपीचंद पडळकरांची खवचट टीका

Gopichand Padalkar on Rohit Pawar: रोहित पवार यांच्या आंदोलनावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी खवचट टीका केली आहे. त्यांच्यासोबतच मंत्री जयकुमार गोरे यांनी ही हे आंदोलन निव्वळ राजकीय स्टंटबाजी असल्याचा टोला लगावला.

रोहित पवारांना अन्नाचा एक घासही देऊ नका, नाटक कशाला करताय? हे काय नटरंगचं शुटिंग आहे का? गोपीचंद पडळकरांची खवचट टीका
गोपीचंद पडळकर, रोहित पवार
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 13, 2026 | 10:19 AM

Gopichand Padalkar on Rohit Pawar: सरसकट कर्जमाफी करावी आणि शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाची माहिती या भागातील राष्ट्रवादीच्या आमदारांनाही नव्हती हे विशेष. त्यामुळे या आंदोलनावरून मोठा गोंधळ उडालेला आहे. तर आता भाजपच्या गोटातून या आंदोलनावर जहरी टीका करण्यात येत आहे. भाजप आमदार गोपींचद पडळकर यांनी रोहित पवारांना दोन-तीन महिने आंदोलन करू द्या अशी खवचट टीका केली. तर दुसरीकडे मंत्री जयकुमार गोरे यांनी हे आंदोलन निव्वळ राजकीय स्टंटबाजी असल्याचा जोरदार हल्लाबोल केला.

रोहित पवार यांना अन्नाचा एक घास देऊ नका

केवळ नाटक करण्यापूरता,रोहित पवारांचे आंदोलन आहे, एक्टिंग करायचे रोहित पवारांना माहिती आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच नाटक कश्याला करताय, हे चित्रपटाचे शूटिंग आहे का ? नटरंग चित्रपटाचे शूटिंगची एक्टिंग करायला गेले आहेत ,का ? अशी खरमरीत टीका पडळकर यांनी केली आहे. त्यांच्या टीकेनंतर वाद पेटण्याची शक्यता आहे. रोहित पवार सध्या पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत.

रोहित पवारांना आपले आवाहन आहे,जोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना साखर कारखानादार एफआरपी देत नाहीत,तोपर्यंत त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवावं, सोलापूर जिल्हा पोलीस प्रमखांना आपली मागणी आहे, रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या बाजूने पूर्ण सुरक्षा लावून, रोहित पवार यांना अन्नाचा एक घास देखील खाऊ देऊ नका. रोहित पवारांना एक दोन महिने आंदोलनला बसू द्या, असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. त्याच बरोबर रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचे खळं सगळ्यात जास्त लुटलंय, अशी टीका देखील पडळकर यांनी केली आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते.

हे आंदोलन निव्वळ राजकीय स्टंटबाजी

रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. रोहित पवार यांचे आंदोलन हा निव्वळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. तर या आंदोलनाला नौटंकी म्हणणाऱ्यांसोबत मी चर्चा करणार नाही अशी भूमिका रोहित पवार यांनी जाहीर केली आहे. कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी रोहित पवार यांना चर्चेचे आमंत्रण दिले आहे. तर मागण्या मान्य होईपर्यंत पुढील भूमिका घेणार नसल्याचा निरोप रोहित पवार यांनी पाठवला आहे.

Follow Us