वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल कोश्यारी शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर; वेदांत अ‍ॅप्लिकेशनचा लोकार्पण सोहळा

| Updated on: Mar 01, 2022 | 8:25 PM

वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 4 मार्च रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विवेकानंद केंद्राच्या वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग ॲन्ड मॅनेजमेंट प्रकल्पाचे लोकार्पण राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.

वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल कोश्यारी शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर; वेदांत अ‍ॅप्लिकेशनचा लोकार्पण सोहळा
Bhagatsingh Koshyari
Image Credit source: TV9
Follow us on

सोलापूर: वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) 4 मार्च रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विवेकानंद केंद्राच्या वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग ॲन्ड मॅनेजमेंट प्रकल्पाचे लोकार्पण राज्यपालांच्या (Governor) हस्ते होणार आहे. विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा निवेदिता भिडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीने जुळे सोलापुरातील (Solapur) बाँबे पार्कनजीक उभारलेल्या विवेकानंद केंद्र वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग अँड मॅनेजमेंट (वि. के. वयम्) या प्रकल्पाचे 4 मार्च रोजी उद्घाटन होणार आहे. सकाळी 10.30 वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे. यावेळी विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष ए. बालकृष्णन् यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच यानिमित्त 4 मार्च ते 6 मार्च या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पद्मश्री निवेदिता भिडे यांनी दिली.

उद्घाटन समारंभास केंद्राचे प्रांतप्रमुख अभय बापट, प्रांत संचालक किरण कीर्तने, नगर संचालक दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या उद्घाटन सोहळ्यानिमित्त दररोज सायंकाळी 6.30 वाजता प्रकल्प स्थळावर (विवेकानंद केंद्र वयम्, बाँबे पार्कनजीक, जुळे सोलापूर) येथे व्याख्यान होणार आहे. 4 मार्च रोजी नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलचे संचालक, सनदी लेखापाल प्रकाश पाठक यांचे विवेकानंद विचारांची प्रासंगिकता, 5 मार्च रोजी विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे यांचे स्वराज्य 75 या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर 6 मार्च रोजी विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे यांचेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व विवेकानंद केंद्राचा सुवर्ण महोत्सव या विषयावर व्याख्यान होईल.

योग ही एक जीवनपध्दती

विवेकानंद केंद्र कन्याकुमारी ‘मनुष्य निर्माण आणि राष्ट्र पुनरुत्थान’ या ध्येयाने देशभरात कार्यरत आहे. शिक्षण, योग, साहित्य प्रसार, ग्रामविकास, पर्यावरण, आंतरराष्ट्रीय विषयांचे संशोधन, संस्कृती संवर्धन यांसह विविध क्षेत्रांमध्ये 1085 शाखा, 40 प्रकल्प आणि 85 शाळांच्या माध्यमातून कार्यरत आहे. योग ही एक जीवनपध्दती आहे. याला आधार मानून जीवनाच्या सर्व क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या सर्वांना योगाच्या माध्यमातून अधिक गुणवत्तापूर्ण जीवन कसे जगता येईल, यावर संशोधन करणारी व प्रशिक्षण देणारी संस्था असावी, या उद्देशाने विवेकानंद केंद्र वेदांतिक अॅप्लिकेशन ऑफ योग अँड मॅनेजमेंट (वि. के. वयम्) या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.

प्रकल्पाचे मिशनः समूहाला प्रशिक्षण

योग एक जीवनपध्दती या संकल्पनेवर आधारित मनुष्यातील क्षमता, प्रावीण्य, उत्कृष्टता व पूर्णत्वाचा विकास करणे हे या प्रकल्पाचे ध्येय (व्हिजन) आहे. तर एकत्वाच्या विचारावर आधारित आणि योग एक जीवनपध्दती या संकल्पनेच्या माध्यमातून मनुष्यातील क्षमता, प्रावीण्य, उत्कृष्टता व पूर्णत्वाचा विकास करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरांतील व्यक्ती व समूहाला प्रशिक्षण देणे, हे या प्रकल्पाचे कार्यउद्दिष्ट (मिशन) आहे.

या उपक्रमांचे मिळणार प्रशिक्षण

या प्रकल्पात योग प्रतिमान, विद्यार्थ्यांसाठी परीक्षा देऊ या हसत खेळत, समर्थ शिक्षक, नवविवाहित दांपत्यासाठी सहयोग, अधिकाऱ्यांसाठी स्वानंद, गर्भवती मातांसाठी मातृत्व योग, शाळा व अन्य प्रशासकीय संस्थांसाठी प्रशिक्षण, उद्योग विश्वातील आवश्यकतेनुसार समूह प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच योग विषयाचे संशोधन होणार असून, परिसंवाद, परिषद आणि व्याख्यानांचे आयोजन केले जाणार आहे.

प्रकल्पातील सुविधा

18 हजार चौरस फुट क्षेत्रावर हा तीन मजली प्रकल्प साकारण्यात आला आहे. यात 100 प्रशिक्षणार्थींच्या निवासाची व्यवस्था आहे. अद्ययावत प्रशिक्षण हॉल, भोजन कक्ष, ग्रंथालय, पुस्तक प्रदर्शन व विक्री दालन, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आदी सुविधा आहेत.

पर्यावरणस्नेही इमारत

इमारतीचे बांधकाम पर्यावरणस्नेही आहे. सोलापूरच्या वातावरणाला अनुकूल अशी इमारतीची रचना आहे. मुबलक सूर्यप्रकाश व खेळती हवा राहील, याची काळजी घेतलेली आहे. यामुळे कमीत कमी ऊर्जेचा वापर होणार आहे. तर इमारतीच्या आतील तापमान बाहेरील तापमानाच्या तुलनेत कमी रहावे, यासाठी बाहेरील बाजूस वेली तर आवारात 100 वृक्ष लावले आहेत. इमारतीला बाहेरुन कोणताही रंग दिला नसून तो नैसर्गिक आहे. आतील बाजूने वेदिक प्लास्टर व वेदिक पेंटचा वापर केला आहे. जलपुनर्भरणाची व्यवस्था केली आहे. यात छतावरील व आवारातील पावसाचे पाणी कुपनलिकेत जाईल, अशी यंत्रणा उभारली आहे. लवकरच 25 किलो वॅट क्षमतेचा सौरऊर्जा वीजनिर्मिती संयंत्र बसविण्यात येणार आहे. यातून प्रकल्पाची विजेची पूर्ण गरज भागणार आहे.

संंबंधित बातम्या

यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यात सौंदर्यावरून जुंपली! राणांच्या टीकेला ठाकुरांचं प्रत्युत्तर

भाजपचं ‘नवाब हटाओ, देश बचाओ’; चोराच्या उलट्या बोंबा, प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात, तर सुप्रिया सुळेंनी जोडले केंद्राला हात