
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादीतील भांडणं अजूनही संपलेले नाहीत. हाके आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमधील वाकयुद्ध संपलेले नाही. तर दुसरीकडे हाके यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यावरील टीकेचा हेका काही सोडलेला नाही. त्यांचे ठेवणीतील शब्द बाण अजूनही झोंबत आहेत. आज तर तसा राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिवस आहे. दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात त्यांचा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यातच लक्ष्मण हाकेंनी शुभेच्छा सोडा उलट बॉम्ब टाकला आहे.
लक्ष्मण हाके यांची पोस्ट व्हायरल
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ती एकदम व्हायरल झाली आहे. पंढरपूर येथे त्यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी काळा दिवस असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी याविषयीची एक पोस्ट सुद्धा फेसबुकवर टाकली. त्यामुळे हाके आणि राष्ट्रवादीतील वाकयुद्ध अजून शमलेले नाही असे समोर येत आहे.
शरद पवार यांच्यावर साधला निशाणा
गेल्या काही दिवसांपासून हाके यांनी अजितदादांविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यांच्या अर्थमंत्री पदावरून आणि निधी वाटपावरून ते सतत टीका करत आहेत. हाके यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीतूनही समाचार घेण्यात आला आहे. आज हाकेंनी त्यांचा मोर्चा अजितदादांहून शरद पवार यांच्याकडे वळवला आहे.
शरद पवारांनी संकटात साथ देणाऱ्या मित्रांची परतफेड शेंडगे घराण्याचे राजकारण संपवून केली तर छगनरावजी भुजबळ असो की प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, लक्ष्मण माने हे नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबत हेलकावे घालत राहिले, असा घाणाघात हाके यांनी केला. त्यांच्यामुळे अनेकांचे राजकीय जीवन संपुष्टात आल्याचा आरोप हाकेंनी केला आहे.
नाव राष्ट्रवादी आणि काम जातीवादी
हाके यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. नाव राष्ट्रवादी आणि काम जातीवादी असा आरोप हाके यांनी केला आहे. तेव्हापासून या पक्षाविरोधात धनगर भटके,विमुक्त ओबीसींच्या मनात प्रचंड तिरस्कार आहे धनगर समाजाच्या अस्तित्वाला सुरूंग लावण्याचे काम राष्ट्रवादी आजही करत आहे. एकीकडे राष्ट्रवादी 26 वा वर्धापन दिन साजरा करते तर दुसरीकडे रायगडावरील धनगरांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
लक्ष्मण हाके यांचा राष्ट्रवादीवर पुन्हा हल्ला
राष्ट्रवादीला धनगर समाजाचे एवढे पित्त का आहे असा सवाल हाके यांनी केला आहे. महाराष्ट्रातल्या दलित चळवळी कोणी फोडल्या? कामगार चळवळी कशा संपवल्या? शेतकरी संघटनेचे तुकडे कोणी केले? ऊसतोड मजुरांचे शोषण कोणी केले? असे सवाल लक्ष्मण हाके यांनी फेसबुक पोस्टद्वारे केले आहेत.