सोमेश्वरच्या निवडणुकीत ‘पश्चिमेचा कटप्पा’ची चर्चा; पोस्टरमधून अजितदादांच्या विश्वासाला दगा दिल्याचा आरोप

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल झालं असून, ‘पश्चिमेचा कटप्पा’ अशी चर्चा सुरू झाली आहे. पोस्टरमधून अजितदादांच्या विश्वासाला दगा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सोमेश्वरच्या निवडणुकीत ‘पश्चिमेचा कटप्पा’ची चर्चा; पोस्टरमधून अजितदादांच्या विश्वासाला दगा दिल्याचा आरोप
someshwar sugar factory election
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 12:35 AM

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टरमुळे सोमेश्वरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये कोणत्याही व्यक्तीचे थेट नाव घेण्यात आलेले नसून ‘पश्चिमेचा कटप्पा’ असा सांकेतिक उल्लेख करण्यात आला आहे.

पोस्टरमध्ये नेमकं काय आहे?

या पोस्टरमधून दिवंगत अजितदादांच्या विश्वासाला दगा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘ज्यांनी दादांच्या आधारावर मोठे होऊन त्याच दादांच्या फॅमिलीची पाठीत खंजीर खुपसला…’ अशा आशयाचा मजकूर पोस्टरवर झळकत असून, त्यातून कोणाला लक्ष्य करण्यात आले आहे, याबाबत सोमेश्वर परिसरात विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Loading...

अजितदादा नसताना पहिली निवडणूक

अजितदादांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीला त्यामुळे भावनिक आणि राजकीय संदर्भही प्राप्त झाला आहे. कारखान्यावरील वर्चस्वाची लढाई सुरू असतानाच पॅनेलची जुळवाजुळव, नाराजांची भूमिका आणि विविध गटांच्या राजकीय हालचाली यामुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले आहे.

पश्चिमेचा कटप्पा पोस्टर

विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात कारखान्याच्या निवडणुकीतील चित्र अधिक स्पष्ट झाले असून, काही इच्छुकांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने सत्ताधारी गटासमोरील राजकीय आव्हानाची चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील ‘पश्चिमेचा कटप्पा’ या पोस्टरने चर्चेत आणखी भर घातली आहे.

पण नेमका कोण?

पोस्टरमध्ये नावाचा थेट उल्लेख नसल्याने ‘पश्चिमेचा कटप्पा’ नेमका कोण? हा प्रश्न सध्या सोमेश्वरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. पोस्टरमधील आरोपांबाबत संबंधित व्यक्ती किंवा गटाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसली, तरी सोशल मीडियावर या पोस्टरची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

आगामी काळात या पोस्टरवरून कोणत्या प्रतिक्रिया उमटतात आणि निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा किती पुढे येतो, याकडे आता सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

(महत्त्वाचं: या सिनेमातील कटप्पा हे पात्र असून त्यावरुन हे सर्व सांकेतिकरित्या हे प्रकरण सुरु आहे.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us