
शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांची अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद पार पडली, विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार घालण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सगळं काही गमती जमतीमध्येच चाललं आहे. जसं इथे उपस्थित असलेल्या सर्वांनी सांगितलं, ग्रामीण भाग असो अथवा शहरी भाग तुम्ही मला एक तरी असा जिल्हा दाखवा, जो खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम आहे. आज आपण पाहिलं तर शेतकरी आत्महत्येचा विषय आहे, गेल्या चार वर्षांमध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, त्याबदल्यात शेतकऱ्यांना एक तरी रुपया भेटला आहे का? पण सगळं काही रेटून न्यायचं विधानसभेत खोटी आश्वासनं द्यायची, असा हल्लाबोल यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मुलुंडमध्ये मेट्रो मार्गिकेचं काम सुरू असताना पॅरापेट भिंतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती, यावरून देखील आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. हे सगळं एका बाजूला सुरु असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं असेल, दोन ते तीन दिवसांपूर्वीचीच घटना आहे, मुलुंडमध्ये मेट्रोचं काम सुरू असताना पॅरापेट भिंतीचा काही भाग कोसळला, त्याच्याखाली एक रिक्षा चिरडली गेली, एका गाडीचा चुराडा झाला. या दुर्घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. किंमत काय लावली त्याला? तर पाच लाख, म्हणजे आता ही आपल्या जीवाची किंमत झाली आहे. मला वाटतं हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. जे स्वत:ला इफ्रामॅन इफ्रामॅन म्हणतात त्यांच्यामध्ये देखील भांडणं सुरू आहेत, इफ्रामॅन मी की तू मी की तू? दोन वर्षात आम्ही की आता दोन वर्षात तुम्ही? अशी ही भांडणं सुरू आहेत. मला एक तरी उदाहरण दाखवा की यांनी जी पायाभूत सुविधांची कामं केली आहेत, ते त्यांनी एक तरी नीट केलं आहे. कोस्टल रोडवर चला, तिथे त्यांनी म्युझिकल रोड केला त्याला विरोध नाहीच चांगलंच आहे. कोणाला अजून काही गंमत जमंत करायची असेल तर काही हरकत नाही, परंतु त्यावर खरोखर साडेसात कोटी खर्च करण्यासारखं काही केलं आहे का? असा सवालही यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीवर देखील चांगलाच हल्लाबोल केला आहे. एमएमआरडीने एक जबरदस्त पूल तयार केला आहे, बॅटच्या आकाराचा, खरं तर ते जगातील 8 वं आश्चर्य वाटावं असा तो पूल आहे. आता असा पूल कोणी जर करत असेल तर तेवढा खर्च करण्याची त्याच्यावर गरज आहे का? त्याची पुढे काही चौकशी झाली आहे का? आणि हे सर्व होत असताना चालू कामामध्ये तुम्ही पाहात आहात दिल्लीमध्ये कोणी तरी उघड्या गटारात जाऊन पडलं, आणखी एका ठिकाणी कोणी तरी कशात जाऊन पडलं. इथे मुलुंडमध्ये वरतून काही तरी पडतंय. मग आयुष्य जगायचं तरी कसं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, पीक विम्याची तुम्हाला मदत मिळत नाही. शहरात नोकऱ्या मिळत नाहीत. बर जे नोकऱ्या शोधतायेत त्यांच्यावर इफ्रास्टक्चर मॅनच वजन पडतं आणि ते खाली चिरडले जात आहेत, राज्यात नेमकं चाललंय तरी काय? हे सर्व या ठिकाणी सुरू आहे, ते म्हणतात गतीमान सरकार पण हे सरकार नो एन्ट्रीमध्ये गतीमान होत आहे, त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.