मराठी भाषा दिन विशेष : नाशिकमधील मराठी साहित्याचं चालतं-बोलतं विद्यापीठ, कोण आहेत वाय. पी. कुलकर्णी?

आज महाराष्ट्रात अनेक मराठी घरं आहेत. मात्र, नाशिकमधील 'मराठी भाषेचं घर' आम्ही आपल्याला आज दाखवणार आहोत.

मराठी भाषा दिन विशेष : नाशिकमधील मराठी साहित्याचं चालतं-बोलतं विद्यापीठ, कोण आहेत वाय. पी. कुलकर्णी?


नाशिक : आज (27 फेब्रुवारी) मराठी भाषा दिन. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस राज्यभर साजरा केला जातो. आपल्या मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेकांनी आपलं आयुष्य वेचलं. आज महाराष्ट्रात अनेक मराठी घरं आहेत. मात्र, नाशिकमधील ‘मराठी भाषेचं घर’ आम्ही आपल्याला आज दाखवणार आहोत. या घरातील नव्वदीतल्या तरुणाला आपण भेटणार आहोत, ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य या मातृभाषेला समर्पित केलंय (Special report on Marathi Language Day Nashik Kusumagraj Y P Kulkarni).

ज्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ मराठी भाषा दिन साजरा केला जातो, त्या कुसुमाग्रजांची नाशिक ही कर्मभूमी. त्याच नाशिकमध्ये आजही मराठी भाषेला समृद्ध करण्याची धडपड सुरू आहे. मराठी भाषेला संपन्न करण्यासाठी, या भाषेला तिचा अभिजात दर्जा देण्यासाठी आणि व्यवहारात मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी अखंड आयुष्य समर्पित करणार नाव म्हणजे म्हणजे नाशिकचे निष्णात अभ्यासक, यशवंत कुलकर्णी. यशवंत कुलकर्णी म्हणजे मराठी भाषेचं एक चालत बोलत संग्रहालयचं. एक विद्यापीठचं म्हणावं लागेल.

‘कुठल्याही गावाला गेलं की किमान 1 पुस्तक विकत घेण्याचा छंद’

सुरकूतल्या बोटांनी पुस्तकाची पानं चाळत आजही ते दिवसातील आठ-दहा तास वाचन करतात. मराठी वाङमयात कदाचितच असं एखादं पुस्तक, एखादं काव्य किंवा एखादा ग्रंथ असेल जो वाय. पी यांच्या नजरे खालून गेला नाही. 7 हजारांहून अधिक मराठी पुस्तकं, ग्रंथ, काव्य संग्रह, आत्मचरित्रं यांचा खच्चून भरलेला ठेवा त्याच्या कपाटातून डोकावतो. विशेष म्हणजे जेवढा पुस्तकांचा संग्रह त्यांच्या घरात आहे, त्याच्या कैकपट त्यांनी तो आपल्या विद्यार्थ्याना वाटला आहे. वाय. पी यांचा सर्वात आवडता छंद म्हणजे कुठल्याही गावाला कामानिमित्त गेलं की किमान 1 पुस्तक तरी विकत घेऊन ते वाचणं.

‘प्रगल्भ वाचनाच्या आवडीचं श्रेय मराठीच्या शिक्षकांना’

सर्वात आश्चर्याचा धक्का तेव्हा बसतो, जेव्हा यातील कोणत्याही पुस्तकातील कोणताही संदर्भ विचारल्यास, ते चटकन पुढचा संदर्भ जोडून सांगतात. एखाद्या तरुणाला अथवा विद्यार्थी दशेत असलेल्या विद्यार्थ्याला लाजवेल असा त्यांचा मराठीचा अभ्यास तुम्हाला अचंबित केल्याशिवाय सोडत नाही. या प्रगल्भ वाचनाच्या आवडीचं श्रेय ते त्यांच्या मराठी शिक्षकांना देतात.

‘आयुष्यात कोण किती संपत्ती जमवतो यापेक्षा तो किती पुस्तकं वाचतो याला महत्व’

 

आयुष्यात कोण किती संपत्ती जमवतो यापेक्षा तो किती पुस्तकं वाचतो याला महत्व असल्याचं वाय.पी सांगतात. मात्र आजच्या मराठी भाषेच्या सद्यस्थितीबद्दल ते नाराजी व्यक्त करतात. मुलांना लहानपणापासून मराठी शिकवली गेली पाहिजे असं आवर्जून सांगताना. ते मराठी भाषा व्यवहारात देखील जास्तीत जास्त वापरली गेली पाहिजे असा आग्रह धरतात.

मराठी साहित्याचं विद्यापीठ असणाऱ्या यशवंत कुलकर्णी यांचा प्रवास

गरिबीत लहानपण गेलं. प्रसंगी हमाली करत वाय. पी यांनी त्याकाळी मराठीत M.A केलं. पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य, ललित कला शाखेचे डीन, 1984 च्या सुमारास व्यावहारिक मराठी हा विषय अभ्यासक्रमात घेणे, मराठी अन्याय निर्मूलन परिषदेचे आंदोलन या आणि अशा ढीगभर उपक्रम आणि आंदोलनात त्यांना खंबीर साथ मिळाली ती त्यांच्या अर्धांगिनीची. त्यांच्या अर्धांगिनी प्रतिभा कुलकर्णी याही मराठीच्या प्राध्यापक आहेत. कामानिमित्त कुठल्याही गावात ही जोडी गेली, की वाय.पी या गावातून एक तरी पुस्तक हमखास खरेदी करायचे. या मराठी भाषा प्रेमी दाम्पत्याच्या आयुष्यात अशा अनेक गोड आठवणींचा मोठा ठेवा आहे.

‘मराठी बोलताना लाज वाटण्यापेक्षा अभिमानाची भावना मनात डोकावली पाहिजे’

यशवंत कुलकर्णी यांच्या घरात मराठी भाषा नांदते अस म्हटलं तर ते वावग ठरणार नाही. आपलं संपूर्ण आयुष्य मराठीच्या संगोपनासाठी आणि समृद्धीसाठी खर्ची घातलेल्या यशवंत कुलकर्णी यांच्या पत्नी मराठीच्या प्राध्यापिका, त्यांचे चिरंजीव देखिल प्राध्यापक, लेखक, साहित्यिक आणि आता त्यांची चौथी पिढी देखील मराठी वाङमयात निष्णात आहे. कुठेही मराठी बोलताना लाज वाटण्यापेक्षा अभिमानाची भावना मनात डोकावली पाहिजे असं ठसकेबाजपणे वाय. पी यांच्या घरातील चौथ्या पिढीचा प्रतिनिधी असलेला श्रेयस सांगतो.

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ असं आपण म्हणतो. मात्र नाशिकचा कुलकर्णी परिवार गेल्या 7 पेक्षा अधिक दशकांपासून मराठीची निस्वार्थ सेवा करतो आहे. कुसुमाग्रजांच्या आणि कानेटकरांच्या या नगरीत, मराठी भाषेची अव्याहत सेवा करणाऱ्या या समर्पित परिवाराला TV9 मराठीचा सलाम!

हेही वाचा :

इंजिनिअरिंगचा अभ्यास आता मराठीतही उपलब्ध होणार, उदय सामंतांची मोठी घोषणा

यंदा मराठी चित्रपटांची खास मेजवाणी; दहा पेक्षाही अधिक चित्रपट होणार रिलीज!

शनिवार विशेष: राज ठाकरेंचा ‘मराठी अजेंडा’ पालिकेत मतं मिळवून देणार? मराठी बोलाचा कसाय बोलबाला?

व्हिडीओ पाहा :

Special report on Marathi Language Day Nashik Kusumagraj Y P Kulkarni