
Palghar Teacher : शिक्षक हा असा गुरू आहे, जो विद्यार्थ्याला आयुष्यभर कामी येणारे धडे देतो. शिक्षकाने शिकवलेल्या मूल्यांवरूनच विद्यार्थी आपली पुढची वाढचाल करतो. महाराष्ट्रात असे काही शिक्षक आहेत, ज्यांन विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा मिळावी म्हणून आयुष्य खर्ची घातले. काही शिक्षक तर असे आहेत, ज्यांची महती महाराष्ट्रच नव्हे तर जगभरात पोहोचलेली आहे. दरम्यान, शिक्षकाच्या याच प्रतिमेला तडा जाईल, असे कृत्य करणारा एक शिक्षक समोर आला आहे. पालघरमधील ही घटना असून या शिक्षकावर मोठी टीका केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे एक अजब प्रकार घडला आहे. येथे शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून विद्यार्थी शाळेऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची धक्कादायक माहिती मधून समोर आली आहे. जव्हारच्या जांभूळ माथा येथील शिक्षक लोकनाथ जाधव यांनी शुक्रवारी काही विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर लांब असलेल्या झर्यावरून पाणी आणण्यासाठी पाठवलं. मात्र पाणी घेऊन शाळेत परतणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्याने या शिक्षकाने चार ते पाच विद्यार्थ्यांना मारहाण मारहाण केली. मारहाण होत असल्याने काही विद्यार्थ्यांनी शाळेत न जाता शाळा संपेपर्यंत जंगलातच लपून राहिले.
या प्रकरणाची राज्यभरात चर्चा चालू आहे. त्यानंतर जिल्हा शिक्षण विभागाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. घटनेसंदर्भात आम्ही चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. चौकशीचा अहवाल आला की आम्ही आजच संबधित शिक्षकावर कारवाई करणार आहोत, असे जिल्हा शिक्षण विभागाने सांगितले आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. जांबुळ माथा येथे पहिली ते आठवीपर्यंत शाळा असून शाळेत 96 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. लोकनाथ जाधव या शिक्षकाबाबत इतरही काही आक्षेप आहेत. हा शिक्षक शाळेत उशिराने योते. तसेच दिवसभर मोबाईलमध्येच असतो. यामुळे विद्यार्थ्यांकडे दुर्ल होते, असा पालकांचा आरोप आहे. त्यामुळे या शिक्षकावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.