सुनेत्रा पवार यांचं एक विधान ज्याने फक्त बारामतीच नव्हे अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या; म्हणाल्या, फक्त पार्थ आणि जयच माझं कुटुंब…

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यापूर्वी भावूक आवाहन केले. "फक्त पार्थ आणि जय नाही, तर संपूर्ण बारामती माझं कुटुंब आहे," या त्यांच्या विधानाने उपस्थितांना गहिवरून आले. अजितदादांचा वारसा पुढे नेण्याचे आश्वासन देत, त्यांनी बारामतीच्या विकासाची प्रतिज्ञा केली. त्यांच्या या हृदयस्पर्शी शब्दांनी महाराष्ट्राच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

सुनेत्रा पवार यांचं एक विधान ज्याने फक्त बारामतीच नव्हे अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या; म्हणाल्या, फक्त पार्थ आणि जयच माझं कुटुंब...
सुनेत्रा पवार
| Updated on: Apr 06, 2026 | 3:04 PM

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी लगेच उपमुख्यमंत्रीपदाची कमान हाती घेऊन पक्षाची सुत्रेही हाती घेतली. अजितदादा नेहमी जनतेच्या सेवेत मग्न असायचे. त्याच पावलावर पाऊल ठेवून सुनेत्रा पवार यांनीही स्वत:ला जनसेवेत झोकून दिलं. नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर त्यांनी भर दिला. आता त्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीला सामोरे जात आहेत. या निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी बारामतीकरांना संबोधित केलं. दादा गेल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी बारामतीकरांना संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांचा कंठ दाटला होता. त्यांना गहिवरून आलं होतं. कंठ दाटलेला असतानाच त्यांनी एक विधान केलं. त्याने केवळ बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. त्या म्हणाल्या, फक्त पार्थ आणि जय माझं कुटुंब नाही. तर संपूर्ण बारामतीकर माझं कुटुंब आहे. त्यांनी हे वाक्य उच्चारताच अनेकांच्या मनात घालमेल झाली अन् डोळ्यात टचकन पाणी आलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने फक्त बारामती नव्हे तर अख्ख्या राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार असून सुनेत्रा पवार या ही निवडणूक लढवणार आहेत. त्याच निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आज त्या बारामती येथे आल्या होत्या. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा मेळावा झाला. त्यावेळी जय पवार, पार्थ पवार ही त्यांची मुलं, सून, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे सर्व प्रमुख नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे्, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते. सर्वांनी उपस्थितांना संबोधित केलं. अखेर सुनेत्रा पवार यांनीही उपस्थितांशी, बारामतीकरांशी संवाद साधला.

सर्वच भावूक

मात्र अजित दादांच्या आठवणीने प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. सुनेत्रा पवार याही बोलत असताना अनेकवेळा त्यांचा कंठ दाटून आला. बारामतीकरांशी मनाचा संवाद साधताना त्यांनी सर्वांना आश्वासन देत बारामतीचा विकास असाच चालू राहील असा शब्द दिला. फक्त जय आणि पार्थ हेच माझं कुटुंब नव्हे तर संपूर्ण बारामती माझं कुटुंब आहे. त्यांच्या तोंडून हे वाक्य ऐकताच उपस्थित सगळेच गहिवरले, अनेकांना अश्रू अनावर झाले. बारामतीची प्रतिष्ठा कमी होणार नाही याचं वचन देते, असंही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या. त्यांचं भाषण ऐकताना फक्त बारामतीकर गहिवरले नाहीत, तर अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. सभागृहातील वातावरण अतिशय भावूक झालं होतं.

दुःख तळघरात कोंडल आणि…

यावेळी सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. आपण आपल्या लाडक्या नेत्याला, दादाला गमावलं. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, बारामतीत पोटनिवडणूक होईल. दादा आपल्यात नाहीत हे अजूनही वाटत नाही, आणि दादा नाहीत हे मला मान्य नाही. दादांसाठी बारमती म्हणजे आईसारखी होती. त्यांचा अखेरचा श्वास हा बारामतीतच विसावला. सगळ्यात दादांचा सहवास आहे. दादांच स्वप्न पूर्ण करण्याआधी दुःख तळघरात कोंडल आणि धीराने बाहेर पडले. हा धीर तुम्हा बारामतीकरांकडे बघून आला आहे. आदरणीय पवार साहेबांनी बारामतीला विकासाचा दृष्टीकोण दिला. दादांनी या बारामतीत रंग भरला आणि कष्टाने फुलवलं, असं त्या म्हणाल्या.

Follow Us