Sunil Tatkare : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रश्न सुनील तटकरे यांनी थेट उत्तर देऊन निकाली काढला, स्पष्टपणे म्हटलं की…

Sunil Tatkare : "आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत आहे. नेता निवडीचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून आलेल्या सदस्यांचा आहे" असं सुनील तटकरे म्हणाले.

Sunil Tatkare : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रश्न सुनील तटकरे यांनी थेट उत्तर देऊन निकाली काढला, स्पष्टपणे म्हटलं की...
Sunil Tatkare
| Updated on: Feb 02, 2026 | 11:41 AM

“आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रिती संगमावरील समाधी स्थळावर उप मुख्यंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर सुनेत्रावहिनी नतमस्तक होण्यासाठी आल्या. चव्हाण साहेबांचे विचार घेऊन आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अडीच वर्ष वाटचाल केली. चव्हाण साहेबांचा विचारांचा वारसा आणि दादांनी आम्हाला दिलेला विचार हे पुढे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सुरु ठेवण्याच्या कर्तव्याच्या भावनेतून वहिनी या ठिकाणी आल्या. नतमस्तक झाल्या. उद्याच्या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी पूर्णपणाने योगदान वहिनींकडून उपमुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्रला मिळेल असा विश्वास आहे” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले त्याला मला फारसं महत्व द्यायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने दादांच्या नेतृत्वाखाली निर्धारपूर्वक एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राज्यातील 13 कोटी जनतेने विधानसभेला त्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे एनडीएमधील आमची सोबत जाण्याची भूमिका त्या ठिकाणी अधोरेखित आहे. प्रत्येक जण आपपल्यापरिने टिकाटिप्पणी करत असतो” असं सुनील तटकरे म्हणाले.

बारामतीत अंत्यसंस्कार सुरु होण्यापूर्वीच सुरु झालेलं

शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत वक्तव्य केलं. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावर प्रतिक्रिया आलेली नाही, यावर सुनील तटकरे यांनी उत्तर दिलं. “विलिनीकरणाबाबत श्रद्धेय साहेबांनी जी प्रतिक्रिया दिली, त्यावर मी बोलणार नाही. इतरांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्या बारामतीत अंत्यसंस्कार सुरु होण्यापूर्वीच सुरु झालेलं. विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात?. शिंदे साहेबांनी भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं, जर कळलं तर नक्की बोलता येईल” असं सुनील तटकरे म्हणाले.

काँग्रेसचा महापौर कोणत्या गटाचा होणार? याची काळजी त्यांनी घ्यावी

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी एका गटाकडून कट शिजवला जातोय असं विजय वडेट्टीवार बोललेत. त्यावर “विजय वडेट्टीवार काय बोलतात, त्यापेक्षा चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर करावा. काँग्रेस अंतर्गत पळवापळवी करणाऱ्या विजय वडेट्टीवारांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेसचा महापौर कोणत्या गटाचा होणार? याची काळजी त्यांनी घ्यावी. नंतर आमच्याकडे पहावं” असं सुनील तटकरे म्हणाले.

एनडीएमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? या प्रश्नावर सुनील तटकरे यांनी एकदम स्पष्ट उत्तर दिलं. “आम्ही एनडीएमध्ये आहोत. भाजपप्रणीत एनडीए आहे. एनडीएमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सत्तेत आहोत. देश गतिमान करण्यासाठी सत्तेत आहोत. ही भूमिका दादांच्या नेतृत्वाखाली घेतली. सामूहिकरित्या पुढे नेण्यासाठी आमचं सर्वांचं कर्तव्य आहे”

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी सुनेत्रा पवार पुढाकार घेणार का?

“भाजपप्रणीत एनडीएमध्ये येण्यासंदर्भात भूमिका ज्यांना सोबत यायचं आहे, त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका पूर्वीपासून ठरली आहे. निवडणुकीला सामोरं गेलो. यश मिळालं” असं सुनील तटकरे म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं यासाठी सुनेत्रा पवारांनी पुढाकार घ्यावा असं म्हटल जातय. “त्यावर दादा असल्यापासून आम्ही एनडीएमध्ये आहोत. म्हणजे भाजपसोबत सत्तेत आहोत. या निर्णयाला जे अनुकूल आहेत, त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे”