…म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला पाहिजे; प्रकल्प रद्द करण्यासाठी सुप्रिया सुळेंचं भर पावसात भाषण, VIDEO
भोर तालुक्यातील प्रस्तावित प्रकल्प रद्द झाला पाहिजे, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द पाहिजे, असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. भोर तालुक्यातील भोंगवली गावातील पुणे ट्रान्समिशन 3 या खासगी कंपनीचा हाय-व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाइनचा प्रकल्प रद्द व्हावा, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. तालुक्यातील शेकडो नागरिक थेट महामार्गावर येऊन बसले. या उपस्थित आंदोलकांना खासदार सुप्रिया सुळे यांनी संबोधित केले. प्रकल्प रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द द्यावा, असं खासदार सुप्रिया सुळे असं आवाहन सत्ताधाऱ्यांना केलं. तुमच्या वतीने मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, ‘बऱ्याच दिवसांनी भोर आणि राजगड तालुक्यातील सर्व पक्षीय प्रेमाचे लोक आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. मुंबईतला कार्यक्रम रद्द करून आज या आंदोलनासाठी आले आहे. घरातली लोक आंदोलन करत आहेत. सत्ताधारी आपल्या लोकांवर अन्याय करत आहेत. संघर्ष समितीसोबत चर्चा करून मोठा वकील करून लवकरात लवकर आपले अटकेत असलेले चार जण आपण सोडवू. प्रत्येकावरचा गुन्हा मागे झालाच पाहिजे. माझा प्रयत्न आहे.. तुमच्यावतीने तातडीने मुख्यमंत्र्यांना संपर्क साधणे. प्रकल्प रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी आपल्याला शब्द दिला पाहिजे’.
काय आहे प्रकरण?
प्रस्तावित हाय व्होल्टेज सबस्टेशन प्रकल्पाविरोधात, व्यापक लढा उभारण्याचा निर्धार करत भाजप नेते माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली ‘सबस्टेशन व टॉवर लाईन हटाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आलीय. भोर तालुक्यातील 71 आणि राजगड तालुक्यातील 45 अशा एकूण 116 गावांमधून या प्रकल्पाच्या 765 के. व्ही. च्या मोठ्या टॉवर लाईन जाणार आहेत. या प्रकल्पाच्या हायटेन्शन टॉवर लाईनमुळे सुपीक जमिनी बाधित होणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील विकासावरही त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे मत या बाधित गावातील शेतकऱ्यांचं आहे. त्यामुळे या गावांतील हजारो शेतकरी (Farmer), भूमीहीन आणि अल्पभूधारक होण्याची शक्यता असून त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे.