Supriya Sule : केंद्रात मंत्रिपदाची चर्चा, डिलिमिटेशन बिलावरून सुप्रिया सुळे थेटच बोलल्या; म्हणाल्या…

सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेदरम्यान डिलिमिटेशन बिलावरून सुप्रिया सुळे यांनी मोठं भाष्य केलं आहे.

Supriya Sule : केंद्रात मंत्रिपदाची चर्चा, डिलिमिटेशन बिलावरून सुप्रिया सुळे थेटच बोलल्या; म्हणाल्या...
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 22, 2026 | 1:21 PM

डिलिमिटेशन विधेयकावरून राजकारण पेटलं आहे. या विधेयकांच्या मंजुरीसाठी खासदारांना एनडीएच्या बाजूने वळवण्यासाठी 150 कोटींचा भाव लावल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी केला आहे. या विधेयकांच्या बाजूने शरद पवार गट मतदान करणार असल्याची चर्चा आहे. त्या बदल्यात सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याच राजकीय चर्चेवर सुप्रिया सुळे यांनी भाष्य करत पहिली प्रतिक्रिया दिली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘ डिलिमिटेशनचं बिल आमच्याजवळ आलेलं नाही. बिल आल्यावर आमचा पक्ष भूमिका स्पष्ट करेल’. तर संजय राऊतांच्या आरोपावर सुळे म्हणाल्या, ‘सशक्त लोकशाहीत आरोप करण्याचा अधिकार आहे’. सरकारच्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीवर त्यांनी भाष्य केलं. सुळे म्हणाल्या, ‘आम्ही स्वत: दर आठवड्याला आमच्या लोकसभा मतदारसंघात आढावा घेत आहे. प्रश्न गंभीर आहे. आम्ही सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. शेवटच्या माणसाला मदत कशी केली जाईल, यासाठी प्रयत्नशील आहे’.

Loading...

सोने-चांदीच्या कोसळणाऱ्या दरावर सुळे म्हणाल्या, मागील आठवड्यापासून बघितलं तर कळत आहे की, सोने-चांदीचा भाव कोसळत आहे. दर स्थिर झालेला नााही. दोन-तीन दिवसांत स्पष्टता येईल. त्याचे कारण समजून येईल’. तर नरेंद्र मोदींच्या विधानावर म्हणाल्या, ‘मोदींचं विधान वाचलं नाही. वृत्तपत्रात अर्थकारणाशी निगडीत बातम्या वाचल्या. ट्रम्प हे चीनमध्ये गेले,त्याचा परिणाम, तेलाचे भाव, दूधाचे दर वाढले आहेत. त्या गोष्टी बघितल्या’.

दिवंगत भाजप खासदार रामराव वडकुते यांना श्रद्धांजली वाहत सुळे म्हणाल्या की, ‘ते राष्ट्रवादीत होते. त्यांनी आमच्यासोबत काम केले. त्यांना पहिल्यांदा विधानपरिषद सदस्य पद राष्ट्रवादीने दिलं होतं. आमचे कौटुंबिक संबंध राहिले आहेत. आमचा पक्ष आणि पवार-सुळे कुटुंबाकडून श्रद्धांजली अर्पण करते. चांगले खासदार होते. त्यांचा स्वभाव चांगला होता. चांगले काम करत होते’.

ठाण्यात राम पूर्णेकरांनी भेट घेतल्यानंतर सुळे म्हणाल्या, ‘राम पूर्णेकर भेटायला आले होते. ते अस्वस्थ आहेत. न्याय मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. आता हिवाळी अधिवेशन येणार आहे.  जितेंद्र आव्हाड यांना विनंती केली आहे की, या प्रकरणात पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी विधानसभेत करावी. जे खरं आहे, ते समोर यावं. न्याय मिळाला पाहिजे. जे वास्तव समोर आलं पाहिजे’.  महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवर सुळे म्हणाल्या, ‘केंद्राचा डेटा देखील सांगत आहे की, महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे.  मी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. माझी अपेक्षा आहे की, महाराष्ट्राचे पोलीस शेतकऱ्यांची मुले आहेत. गुन्हेगारी वाढतेय, त्यावर चर्चा झाली पाहिजे. अधिवेशनात आमचे दहा आमदार हे सविस्तर चर्चा करतील’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us