फॉर्च्युनर पलटल्याने नाशिक येथे तिघा साईभक्तांचा मृत्यू, नगर येथे खड्ड्याने घेतला एकाचा बळी

सुरतहून नाशिककडे येणाऱ्या फॉर्च्युनर गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सुरतचे तीन साईभक्त ठार झाले आहेत.तर नगर मनमाड महामार्गावरील दुसऱ्या अपघातात खड्ड्याने एका दुचाकीस्वाराचा बळी घेतला आहे.

फॉर्च्युनर पलटल्याने नाशिक येथे तिघा साईभक्तांचा मृत्यू, नगर येथे खड्ड्याने घेतला एकाचा बळी
| Updated on: Oct 29, 2025 | 5:16 PM

नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर चालकाचे फॉर्च्युनर गाडीचे नियंत्रण सुटल्याने सुरतहून शिर्डीकडे निघालेल्या तिघा साईभक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येवला तालुक्यातील एरंडगाव-रायते शिवारात फॉर्च्युनर गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीने तीन पलटी घेतल्या. यात तिघा साईभक्तांचा मृ्त्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींवर नाशिक येथे उपचार सुरु असून या प्रकरणाचा अधिक तपास येवला पोलिस करत आहेत.

खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी

नगर – मनमाड महामार्गावरील खड्ड्यांनी पुन्हा एकदा एका तरुणाचा बळी गेला आहे. कोपरगाव येथील आदित्य देवकर यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. येवला नाका येथे बजाज शोरूमसमोर मध्यरात्री ही घटना घडली आहे. महामार्गावरील खड्डे आणि त्यात साचलेले पावसाचे पाणी यामुळे खडड्‌यात आदळून पडलेल्या तरुणाच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. रस्त्यांतील खड्ड्यांविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नगर-मनमाड रस्ता मृत्यूचा महामार्ग बनला असून तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे.

एसटी बस आणि कारच्या अपघातात, दोन जखमी

जालना छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील बदनापूर शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर शेलगाव नजीक एसटी महामंडळाच्या बसचा आणि कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये कारमधील एक जण गंभीर जखमी असून दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. एसटी बस छत्रपती संभाजीनगरवरून जालन्याच्या दिशेने जात होती तर कार चालक इंधन भरण्यासाठी दुभाजक पार करत असताना हा अपघात घडला. दरम्यान, जखमीला पुढील उपचारासाठी जालनाकडे हलवण्यात आल आहे.

बेल्हे जेजुरी महामार्गावरील शिरूर तालुक्यातील चांडोह येथे कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा अपघात झाला असून महामार्गालगतच्या खड्ड्यात पिकअप गाडी पलटी होऊन पाच महिला कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत.सर्व जखमींवर पारगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रक भरधाव वेगात आला अन् वाहनांना उडवत गेला

पुण्यात फरश्या घेऊन कात्रज चौकाकडून नवले पुलाच्या दिशेने निघालेल्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून विचित्र अपघात घडला.या अपघातात एकूण तीन वाहनांचे नुकसान झाले असून यात दोन वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत.याप्रकरणी मूळचा उत्तर प्रदेश येथील राहणारा ट्रकचालक तौफिक इसरार अहमद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

येथे पाहा पोस्ट –

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फरशा घेऊन निघालेला ट्रक नवले पुलाखाली आला असता ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रेडिमिक्स डंपर वाहन आणि दोन कारला त्याने जोराची धडक दिली. यात तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली. यातील ट्रकचालक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.