शेतकरी उपाशी अन् नेत्याचा काजू बदामावर ताव, सुषमा अंधारे आक्रमक, थेट शेतातील सोयाबीन दाखवत म्हणाल्या.., Video
राज्यात पावसाने दडी मारली आहे, पाऊस नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विरोधकांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर आता सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्यात पावसाने दडी मारली आहे. गेल्या दीड महिन्यात पाऊस झालेला नाहीये. सुरुवातीचे दोन महिने सोडले तर यंदा संपूर्ण पावसाळा कोरडा गेला आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. आता शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. राज्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांकडून सुरू आहे.
दरम्यान याच सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी थेट आपल्या शेतातील सोयाबीनचं पिक दाखवत सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तसेच आढावा बैठकीवेळी सोशल मीडियावर व्यस्थ असलेल्या अधिकाऱ्यांवरून देखील त्यांनी सरकारला टोला लगावला आहे.
राज्यात पावसाने दडी मारली आहे, पाऊस नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विरोधकांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर आता सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. pic.twitter.com/LYtFH6j76z
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 20, 2026
नेमकं काय म्हणाल्या अंधारे?
‘हे माझ्या शेतातील सोयाबीन, शेंगा जर तुम्ही बघितल्या तर त्यामध्ये दोन दाने देखील भरले नाहीत. दुष्काळ फक्त औपचारिकता म्हणून जाहीर करण्याचा अवकाश आहे. परंतु इथे सगळी दुष्काळीच परिस्थिती आहे. त्यामुळे अशा काळात खरं म्हणजे सरकारने थेटपणे दुष्काळ जाहीर केला पाहिजे. मात्र सरकार फक्त पहाणी दौरेच करत आहे. ही शेंग पहा, या संपूर्ण एका सोयाबीनच्या शेंगेमध्ये फक्त एक दाणा आहे. शेतकरी उपाशी मरतोय अन् नेते मात्र काजू बदामावर ताव मारत आहेत. आज पुन्हा एकदा आणखी एक गोष्ट पुढे आली आहे, ती म्हणजे पहाणी दौऱ्याची बैठक सुरू आहे, आणि अधिकारी सोशल मीडियामध्ये व्यस्त होते. अधिकाऱ्यांची काही चूकच नाही. सत्ताधारी नेत्यांना पाहिजे असलेलं कमिशन जर बिनबोभाट पोहोचवलं जात असेल तर अधिकाऱ्यांना नेत्यांचा धाक असण्याचं काही कारण नाही, पण या सगळ्यांमध्ये दुष्काळाने त्रस्त झालेला जो शेतकरी आहे, त्याचा वाली कोणीच नाही,’ असं यावेळी सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.