पुण्यात कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांवरच आरोपींचा गोळीबार, काय घडले नेमके ?
पुणे जिल्ह्यातील कायदा - सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट असून आता अटकेची कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार करण्याची गुंडांची मजल गेली आहे.

पुण्याच्या रांजणगावात एका गुन्ह्यासाठी आरोपीच्या शोधासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी देखील स्वसंरक्षणासाठी आरोपींवर गोळीबार केला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली असून आरोपींनी त्यानंतर उसाच्या शेतात घुसून पलायन केल्याचे उघडकीस आले असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. कालच पिंपरी-चिंचवड येथे एका फर्निचर मॉलवर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यातच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पुण्यातील गुन्हेगारी काय कमी होण्याचे नावच घेत नाहीए अशी परिस्थिती आहे. एकीकडे कोयता गँगचा नंगानाच सुरु असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव जवळील सोने सांगवी गावात पिंपरी – चिंचवड पोलिस एका गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी आले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिस आलेले पाहून त्यांच्यावर थेट गोळीबार केल्याची घटना घडली आहे.यावेळी पोलिसांनी सावध होत लागलीच या स्वसंरक्षणासाठी आरोपींवर गोळीबार केला. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आरोपींनी पोलिसांना गोळीबार चुकून घटनास्थळावर ऊसाच्या शेतात घुसून पलायन केले आहे.
रांजणगाव जवळील घटना..
पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव जवळील सोने सांगवी येथे पोलिस एका गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पिंपरी-चिंचवड पोलिसांना दोन आरोपींनी गोळीबार केला. पोलिसांनी देखील संरक्षणासाठी आरोपींवर गोळीबार केला. त्यामुळे हे आरोपी ऊसाच्या शेतातून पसार झाले. या घटनेत सुदैवाने पोलिसांना यात गोळी लागली नाही.
आरोपी पोलिसांवर गोळीबार करून बिनधास्त ऊसाच्या शेतात पळुन गेले आहे. आरोपींच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिस आणि पिंपरी चिंचवड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शार्प शुटर्सचा गोळीबार
पिंपरी-चिंचवड येथेच लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शार्प शुटर्सनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली होती. काल रात्री सव्वा नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडांनी पिंपरी-चिंचवड येथील प्रसिद्द ‘एजे’ फर्निचर मॉलवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.