
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मनमानी कारभाराबद्दल आज विधान परिषदेत आमदारांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. भारत इंग्लंड सामन्याच्या तिकीटांबद्दल विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करण्यात आला, यावेळी आमदार चांगलेच आक्रमक झाले. सनदी अधिकाऱ्यांना पोलिसांना तिकीट मिळतात, पण आमदारांना पास मिळत नसल्याची खंत यावेळी आमदारांनी बोलून दाखवली. दरम्यान दुसरीकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सुरु असलेल्या तिकीटीच्या कारभाराबद्दल सभापती राम शिंदे यांची देखील नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान भारत इंग्लंड सामना आज मुंबईत होत आहे, त्याचं कौतुक आहे. शरद पवार BCCI चे अध्यक्ष असताना आणि अधिवेशन सुरू असताना सदस्यांना पासेस दिले जायचे. पंरतु आता मोठ-मोठ्या कंपन्यातील लोक सुद्ध तिथे जाऊन बसतात, परंतु अधिवेशन सुरू असताना आमदारांना जायचं असेल तर पास मिळत नाहीत. सनदी अधिकाऱ्यांना पोलिसांना तिकीट मिळतात, पण आमदारांना पास मिळत नाहीत. तिकीट मिळवायचं असेल तर अनेकांना मस्का लावावा लागतो, तेव्हा तिकीट मिळतं, असं यावेळ प्रतिक्रिया देताना आमदार सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सामना असल्यावर आम्ही तिकीट देतो, तसेच यांनीही पासेस द्यावेत. अधिवेशन सुरु असताना सदस्यांना सामन्यासाठी जाण्यासाठी व्यवस्था असावी, अशी मागणी यावर मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
दरम्यान यावर बोलताना सभापती राम शिंदे यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. सचिन अहिर यांनी मांडलेली परिस्थिती अतिशय केविलवानी आहे. क्रीडामंत्री बघ्याची भूमिका घेत आहेत. आमदारांसाठी पासेसची व्यवस्था करायला हवी असं, असं यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी म्हटलं आहे. तर अनिब परब यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला फुकट देऊ नका, आमच्याकडून पैसे घ्या तुमचं आम्हाला फुकट काहीच नको, असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे. तर याला उत्तर देताना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी क्रीडा विभागाची बाजू मांडली आहे. क्रीडा विभागाला पासेस दिले जात नाहीत. भविष्यात अधिवेशन काळात सामने असतील तर पासेस उपलब्ध करून द्यायची तरतूद करू, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.