Chhagan Bhujbal : राज्यसभेवर जाणार का? भुजबळांकडून एक घाव दोन तुकडे, थेट संगून टाकलं
सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत केलं होतं. दरम्यान त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. परंतु त्यानंतर अजित पवार यांचं अपघातात निधन झाल्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या त्यानंतर त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा मोठा विजय झाला. त्यांनी मताधिक्याचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. तब्बल 2 लाखांपेक्षाही अधिक मतांच्या फरकाने सुनेत्रा पवार यांचा बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय झाला.
दरम्यान सुनेत्रा पवार या विधानसभेच्या सदस्य झाल्याने त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी पक्षाकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर आता छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राज्य सभेवर मला पाठवा असा माझा आग्रह नाही, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. परंतु पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. सुनेत्रा पवार या विधानसभा सदस्य झाल्याने त्यांनी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
सुनेत्राताई या आता उपमुख्यमंत्री आहेत आणि त्या विधानसभेत देखील निवडून आल्या आहेत, त्यामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. आता मुळ मुद्दा हा आहे की? त्यांच्या जागी कोण जाणार? हे आम्ही मीडियामध्ये पहात असतो, वर्तमान पत्रांमध्ये वाचत असतो. अजून त्याच्यावर चर्चा वगैरे काही झालेली नाही. मला तरी तशी कोणतीही माहिती नाही. त्यामुळे पक्ष काय निर्णय घेईल तो घेईल. आता माझ्याबद्दल बोलाल तर माझ्याकडे मंत्रिपद आहे. मी ज्येष्ठ मंत्री आहे. त्यामुळे मला राज्यसभेवरच पाठवा असा आग्रह धरणं चुकीचं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.