
केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. साहित्य, शिक्षण, समाजसेवा, वैद्यक, कला आणि सार्वजनिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना पद्म पुरस्काराने संम्मानित करण्यात येणार आहे. यात ब्रजलाल भट्ट, बुद्री थडी, भगवान दास रायकवार, रघुवीर खेडकर, धरमलाल चुन्नीलाल पंड्या, डॉ. श्याम सुंदर, चरण हेम्ब्रम आणि के. पझनीवेल या मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान होणार आहे. महाराष्ट्रातील तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तमाशा संस्कृती टिकवण्यात आणि राज्याबाहेर तिचा प्रसार करण्याच रघुवीर खेडकर यांनी मोलाचे योगदान दिले आहे. गावाखेड्यात तमाशा सादर करणाऱ्या रघुवीर खेडकर यांचा पद्मश्री पर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊयात.
रघुवीर खेडकर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत ज्येष्ठ, लोकप्रिय तमाशा कलाकार कलाकार आहेत. संगमनेरचे सुपुत्र असलेले खेडकर हे तमाशातील सोंगाड्या या भूमिकेसाठी प्रसिद् आहेत. दरवर्षी महाराष्ट्रातील गावागावांमध्ये यात्रा भरते. या यात्रेत रघुवीर खेडकर तमाशा सादर करतात. त्यांच्या कलेने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य केले आहे. त्यांना याआधीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. तमाशा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ‘तमाशा महर्षी’ म्हणून ओळखले जाते.
रघुवीर खेडकर यांना तमाशाची कला ही वारशात मिळालेली आहे. त्यांच्या मातोश्री कांताबाई सातारकर या एक महान तमाशा कलावंत होत्या. बालपणापासूनच त्यांच्या मनात तमाशाविषयी प्रेम निर्माण झाले. त्यांनी आईचा वारसा पुढे सुरू ठेवत पारंपरिक लोकनाट्य तमाशाची परंपरा जपली आहे. गेली अनेक वर्षे ते तमाशा मंडळाचे नेतृत्व करत आहेत. कलाक्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ मिळालेला आहे.
कोरोना काळात तमाशा कलावंतांवर खराब दिवस आले होते. अनेक गावांमधील यात्रा रद्द झाल्याने तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी रघुवीर खेडकर खेडकर यांनी तमाशा कलावंतांच्या मदतीसाठी सरकारकडे मागणी केली होती. त्यांना अनेक तमाशा कलावंतांचा पाठिंबाही लाभलेला होता. कोरोना संपल्यानंतर तमाशा पुन्हा सुरू झाले आहेत. रघुवीर खेडकर गण, गवळण, बतावणी आणि वगनाट्य अशी पारंपारिक कला सादर करून गावाखेड्यातील लोकांचे मनोरंजन करताना पहायला मिळत आहे. त्यांच्या या कलेची दखल घेत आता त्यांना पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.