‘सरकारने मोठ्या चतुरपणाने मेक मारली…’; हिंदीच्या मुद्द्यावर तारा भवाळकर नेमकं काय म्हणाल्या?
पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीच्या सक्तीविरोधात राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, यावर प्रतिक्रिया देताना आता तारा भवाळकर यांनी देखील सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीच्या सक्तीविरोधात राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, मराठी भाषेच्या मुद्द्यावर मोठं आंदोलन सुरू आहे, मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी मागणी होत आहे. याच मुद्द्यावरून आता ज्येष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी देखील सरकारला जोरदार टोला लगावला आहे. सरकारने मोठ्या चतुरपणाने त्रीभाषिक अशी भाषा वापरली आहे, त्यांनी हिंदी भाषा सक्तीची असे कुठेही म्हटले नाही. त्रीभाषा सूत्र असे म्हणत मेक मारली आहे, असं भवाळकर यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या भवाळकर?
सरकारने मोठ्या चतुरपणाने त्रीभाषिक अशी भाषा वापरली आहे, त्यांनी हिंदी भाषा सक्तीची असे कुठेही म्हटले नाही. त्रीभाषा सूत्र असे म्हणत मेक मारली आहे, असा आरोप अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केला आहे. तुम्हीच 3 री भाषा निवडा असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोठ्या चतुरपणाने म्हंटले आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, लहान कोवळ्या मुलांवर अन्याय करू नका, चौथीपर्यंत मातृभाषा शिकवावी आणि त्यानंतर अन्य भाषेबाबत विचार करावा. माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही, मात्र हिंदीची शक्ती करू नये, असं मत ज्येष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केलं आहे.
मनसे आक्रमक
राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिदींचा विचार सुरू आहे, राज्य सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. राज्यात हिंदीची सक्ती नको अशी विविध संघटनांची मागणी आहे. हिंदीच्या मुद्द्यावर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. याविरोधात मनसेनं आंदोलन सुरू केलं आहे. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी मनसेची भूमिका आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना आता तारा भवाळकर यांनी देखील सरकारवर टीका केली आहे.
