
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या ठिकाणी कबुतरखान्याच्या मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यातच आता ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलातील एका तरुणाचा कबुतराला वाचवण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्सव पाटील असे या तरुणाचे नाव आहे. दिवा-शीळ रोडवरील खर्डीगावात सोमवारी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली. ज्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
उत्सव पाटील हा अग्निशमन दलात कार्यरत होता. तो नेहमीप्रमाणेच कर्तव्य बजावण्यासाठी तत्पर असायचा. रविवारी १२ ऑक्टोबर रोजी खर्डी गावात ओव्हरहेड वायरवर एक कबूतर अडकल्याची माहिती दिवा अग्निशमन केंद्राला मिळाली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कबुतराचा जीव वाचवणं ही सामान्य बाब होती, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. कबुतराची सुटका करत असताना उत्सव पाटील यांना हाय व्होल्टेज विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यासोबतच त्याचा सहकारी जवान आझाद पाटील यांनाही विजेचा धक्का लागला. या धक्क्यात त्यांच्या हाताला आणि छातीला भाजले असून, त्यांच्यावर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ठाणे महापालिकेच्या अग्निशामक दलातील अवघ्या २८ वर्षांच्या उत्सव पाटील यांनी एका निष्पाप जीवासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले. उत्सव पाटील यांना गंभीर अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कर्तव्य बजावत असताना उत्सव पाटील यांचा मृत्यू झाल्याने अग्निशमन दल आणि पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कबुतराला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाची जीवनयात्रा हाय व्होल्टेज विजेच्या धक्क्याने संपली.
या घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणावर स्थानिकांनी व सहकारी जवानांनी संताप व्यक्त केला आहे. मदतकार्यासाठी धावणाऱ्या जवानांना योग्य सुरक्षा साधने मिळत नसल्याचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. दरम्यान, प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. उत्सव पाटील यांच्या बलिदानाने प्रशासनातील निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.