महायुतीत पुन्हा नाराजीनाट्य, शिंदेंच्या उमेदवाराचा अर्ज भरताना भाजपचे 9 आमदार गायब; ठाण्यात नेमकं काय घडतंय?

ठाणे विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी अर्ज दाखल केला, मात्र भाजपच्या ९ प्रमुख आमदारांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे.

महायुतीत पुन्हा नाराजीनाट्य, शिंदेंच्या उमेदवाराचा अर्ज भरताना भाजपचे 9 आमदार गायब; ठाण्यात नेमकं काय घडतंय?
eknath shinde devendra fadnavis
| Updated on: Jun 02, 2026 | 11:44 AM

सध्या राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. येत्या १८ जूनला विधानपरिषदेसाठी मतदान होणार आहे. ठाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार रवींद्र फाटक यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, हा अर्ज दाखल करताना भाजपच्या दिग्गज नेत्यांसह तब्बल ९ आमदार गैरहजर असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे आता जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. भाजपची ही अंतर्गत नाराजी आगामी निवडणुकीत रवींद्र फाटक यांना घातक ठरणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

भाजपच्या अनुपस्थितीमुळे नाराजीच्या चर्चांना उधाण

ठाणे जिल्ह्यात भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने ही जागा भाजपला हवी होती, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, ही जागा शिवसेनेच्या पदरात पडल्याने भाजपच्या गोटात कमालीची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. रवींद्र फाटक यांनी नुकताच अर्ज दाखल केला. मात्र अर्ज भरताना भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, मंदा म्हात्रे आणि नरेंद्र मेहता यांच्यासह ९ प्रमुख आमदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. या आमदारांच्या अनुपस्थितीमुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कोणीही नाराज नाही, सर्व आमदारांचे आशीर्वाद माझ्यासोबत: रवींद्र फाटक

आता भाजप आमदारांच्या गैरहजेरीवर आणि नाराजीच्या चर्चांवर उमेदवार रवींद्र फाटक यांनी भाष्य केले. शिवसेना-भाजप युतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला उमेदवारी देण्यात आली आहे. अर्ज भरताना दोन्ही पक्षांचे अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजपचे आमदार आज प्रत्यक्ष उपस्थित नसले, तरी माझे रवींद्र चव्हाण, गणेश नाईक, नरेंद्र मेहता, संजय केळकर आणि मंदा म्हात्रे या सर्व भाजप आमदारांशी सविस्तर बोलणे झाले आहे, असे रवींद्र फाटक यांनी सांगितले.

आमदार मंदा म्हात्रे या आजारी असल्याने येऊ शकल्या नाहीत, त्यांनी मला फोनवरून शुभेच्छा दिल्या. तर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी मला फोन करून पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. हे सर्व आमदार आपापल्या पूर्वनियोजित कामांमुळे येऊ शकले नाहीत. भाजप पक्ष माझ्या पाठीशी सक्षमपणे उभा असून महायुतीत कोणीही नाराज नाही, असेही रवींद्र फाटक म्हणाले.

विरोधकांच्या गाठीभेटी घेणार; विकासासाठी कटिबद्ध

कोविड काळामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका वेळेत होऊ शकल्या नाहीत, मात्र आता महायुतीच्या माध्यमातून आम्ही जोमाने कामाला लागलो आहोत. आगामी काळात ते हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांच्यासह मनसे आणि एमआयएम (MIM) पक्षाच्या नेत्यांच्याही गाठीभेटी घेणार आहेत. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात कोणत्याही स्तरावर बंडखोरी झालेली नाही, असा दावा फाटक यांनी केला.

महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन काम करत आहेत. आम्हाला ९९ टक्के मतदान मिळेल आणि महायुतीचाच विजय होईल. येत्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठाणे-पालघर जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी देऊन विकासकामांना गती देतील आणि आम्हीही अधिक निधी आणण्याचा प्रयत्न करू,” असा विश्वास रवींद्र फाटक यांनी व्यक्त केला.

दरम्यान आता लवकरच महायुतीची एकत्रित बैठक होणार आहे. त्यानंतर सर्व पक्ष एकत्र येऊन जोरदार प्रचार करु, असे सांगत रवींद्र फाटक यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र रवींद्र फाटक यांचा अर्ज भरताना आमदारांची अनुपस्थिती मतदानात काय भूमिका बजावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us