पूर्णेकर हत्या प्रकरण तापलं ! राजन विचारे पोलिसांवर भडकले, धारेवर धरत विचारला सवाल

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामुळे ठाण्यात तणाव वाढला आहे. माजी खासदार राजन विचारे यांनी पोलिसांवर संताप व्यक्त करत, तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप केला. या प्रकरणामुळे ठाण्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.

पूर्णेकर हत्या प्रकरण तापलं ! राजन विचारे पोलिसांवर भडकले, धारेवर धरत विचारला सवाल
| Updated on: Oct 29, 2026 | 3:44 PM

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामुळे ठाण्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. पूर्णेकर कुटुंबीयांनी न्यायाच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी नौपाडा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं होतं, तर पोलीस ठाण्याबाहेर रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं होतं. या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापलं असून, आज दोन्ही शिवसेना गटांकडून ठाण्यात आंदोलन करण्यात येत आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जे आरोप आहेत, त्याचा निषेध करत शिंदेंच्या  शिवसेनेकडून टेंभी नाक्यावर शक्तिप्रदर्शन सुरू आहे.  तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट हा पूर्णेकर हत्येवरून आक्रमक झाला असून आज नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह अनेक शिवसैनिक ठाण्यात धडकणार आहेत. आदित्य ठाकरे हे पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासाला गती मिळावी आणि आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती मिळावी, यासाठी माजी खासदार राजन विचारे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी पोलिसांशी संवाद साधताना त्यांचा संताप अनावर झाला. तपासातील कथित दिरंगाईवरून त्यांनी पोलिसांना जाब विचारला.

Loading...

पोलिसांसमोर राजन विचारे आक्रमक; विचारला जाब

पोलीस ठाण्यात पोलिसांशी चर्चा करत असताना राजन विचारे यांनी मानपाडा नाक्यावरील दगडफेकीच्या घटनेचा उल्लेख केला. या घटनेचा व्हिडिओ पोलिसांना सविस्तर दिला असून, संबंधित तरुण आदल्या रात्री उपस्थित होता, असं त्यांनी सांगितलं. तरीही त्याच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “आम्ही तुमच्याकडे तक्रार करत नाही, तुम्ही त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही. काय चाललंय, काय सांगा मला? हे दिवसाढवळ्या खुनाचे प्रयत्न चालू आहेत,” अशा शब्दांत राजन विचारे यांनी आपला संताप व्यक्त केला. यापुढे त्यांनी पोलिसांना थेट सवाल केला, “तुम्ही वाट बघताय का, मर्डर होण्याच्या?” त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. “विचारे साहेब, ही बोलण्याची पद्धत नाही. शांत व्हा,” असं म्हणत पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

‘एखादा जीव गेल्यावरही लक्ष घालणार नाही का?’

मात्र, राजन विचारे यांचा संताप कायम होता. “डिपार्टमेंट काय करतंय काम? हे काय आहे, सांगा ना मला,” असं म्हणत त्यांनी काही पेपर दाखवत पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावर पोलिसांनी त्यांना, “आपण बोलतोय ना,” असं म्हणत पुन्हा शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर विचारे यांनी नाराजी व्यक्त केली. “अहो, बोलतोय म्हणजे किती आता? एखादा जीव गेल्यावरसुद्धा तुम्ही काही लक्ष घालत नाही,” असं म्हणत त्यांनी हताशपणे आपली भूमिका मांडली.

एकूणच, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासावरून राजन विचारे यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं. या प्रकरणामुळे ठाण्यातील वातावरण अधिकच तापलं असून, आता पोलीस तपास आणि पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us