नाल्यात पडून बाईकस्वाराचा मृत्यू, कुटुंबियांस दहा लाखांचे अर्थसाह्य द्या, राष्ट्रवादीची मागणी

| Updated on: Jun 16, 2021 | 9:22 PM

ठाण्यातील कोरम मॉल येथील एका नाल्यात पडून बाईकस्वार युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (15 जून) घडली (Biker death due to falling into drain in Thane).

नाल्यात पडून बाईकस्वाराचा मृत्यू, कुटुंबियांस दहा लाखांचे अर्थसाह्य द्या, राष्ट्रवादीची मागणी
नाल्यात पडून बाईकस्वाराचा मृत्यू, कुटुंबियांस दहा लाखांचे अर्थसाह्य द्या, राष्ट्रवादीची मागणी
Follow us on

ठाणे : ठाण्यातील कोरम मॉल येथील एका नाल्यात पडून बाईकस्वार युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (15 जून) घडली. पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप करुन मयताच्या कुटुंबियांना दहा लाखांचे अर्थसाह्य द्यावे, अथवा त्यांच्या कुटुंबियांना ठामपाच्या नोकरीमध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर यांनी ठामपाकडे केली आहे (Biker death due to falling into drain in Thane).

नेमकं काय घडलं?

दिवा येथे राहणारे प्रसाद देऊळकर काही कामानिमित्त संभाजीनगर भागात राहणार्‍या त्यांच्या मित्राच्या घरी आले होते. मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने घरी परतत असताना पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी खणलेल्या खड्ड्यात दुचाकीसह पडले. त्यामध्ये प्रसाद देऊळकर यांचा मृत्यू झाला (Biker death due to falling into drain in Thane).

‘मृतकाच्या कुटुंबियांना 10 लाखांचे अर्थसाह्य द्या’

प्रसाद देऊळकर यांच्या मृत्यूला ठाणे पालिकेचे नाकर्ते प्रशासन आणि संबधित अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप ठाणे युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी केला आहे. खामकर यांनी या संदर्भात आज ठामपाचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख आणि विरोधी पक्षनेते शानू पठाण यांची भेट घेऊन देऊळकर यांच्या कुटुंबियांना पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे अन्यथा, त्यांच्या कुटुंबियांना 10 लाखांचे अर्थसाह्य द्यावे, अशी मागणी केली.

या संदर्भात विक्रम खामकर यांनी सांगितले की, देऊळकर यांचा मृत्यू हा ठामपा अधिकार्‍यांच्याा नाकर्तेपणामुळे झाला आहे. पालिका अधिकार्‍यांनी जर वेळीच दक्षता घेतली असती तर देऊळकर कुटुंबियांच्या घरातील कर्त्या तरुणाचा जीव वाचला असता. त्यामुळेच या युवकाच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी.

अश्रफ शानू पठाण यांची प्रतिक्रिया

“आम्ही सदर ठिकाणी दौरा करुन प्रशासनाला धोक्याची कल्पना दिली होती. मात्र, पालिकेने दखल न घेतल्यानेच एका तरुणाचा जीव गेला आहे. त्यामुळे आगामी महासभेत आपण सदर तरुणाच्या कुटुंबियांना पालिका सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव मांडणार आहोत”, अशी प्रतिक्रया विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी दिली.

अतिरिक्त आयुक्तांचं आश्वासन

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून कुटुंबियांची पार्श्वभूमी तपासून योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येईल, असं आश्वासन अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलं.

हेही वाचा : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले आहेत! ठाण्यात पोस्टरबाजी, चर्चेला उधाण