50 कुठं आणि 105 कुठं?… भाजपचा ‘तो’ बॅनर चोरीला, मध्यरात्रीच काम तमाम?; भाजप पुन्हा आक्रमक

| Updated on: Jun 15, 2023 | 1:30 PM

50 कुठं आणि 105 कुठं?... असा मजकूर लिहिलेला भाजपचा बॅनरच चोरीला गेला आहे. उल्हासनगरात हा बॅनर लावण्यात आला होता. शिंदे गटाला डिवचणारा हा बॅनर चोरीला गेल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

50 कुठं आणि 105 कुठं?... भाजपचा तो बॅनर चोरीला, मध्यरात्रीच काम तमाम?; भाजप पुन्हा आक्रमक
bjp banner
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणे : उल्हासनगर शहरात शिंदे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपामध्ये सध्या बॅनरवॉर सुरू आहे. शिवसेनेच्या बॅनर्सला उत्तर देण्यासाठी भाजपने काल रात्री ’50 कुठे आणि 105 कुठे?’ असा शिवसेनेला डिवचणारा बॅनर लावला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच उल्हासनगरातही भाजपच्या या बॅनर्सची जोरदार चर्चा रंगली होती. पण ही चर्चा सुरू असतानाच हा बॅनर मध्यरात्रीच्या सुमारास गायब झाला आहे. हा बॅनर चोरीला गेल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. ‘प्रत्युत्तर द्यायचं असेल, तर कामातून द्या, चोऱ्या करून नव्हे!’ असा टोलाही भाजपने शिवसेनेला लगावला आहे. त्यामुळे आता या बॅनर्स चोरीच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष आमने सामने येण्याची शक्यता आहे.

कल्याण लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलंच युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. त्याचे लोण फक्त कल्याण-डोंबिवलीपर्यंत मर्यादित राहिले नसून ते उल्हासनगरपर्यंत पोहोचले आहे. एकमेकांच्या विरोधात बॅनर्स लावून दोन्ही पक्षांनी एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्यानंतर भाजपनेही ’50 कुठे आणि 105 कुठे? हा आमच्या भाजपचा मोठेपणा.. देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है!’ असा मजकूर असलेला बॅनर लावला होता. उल्हासनगरच्या 17 सेक्शनच्या चौकात हा बॅनर लावला होता.

हे सुद्धा वाचा

आम्हीही तसंच उत्तर देऊ

भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपिल अडसूळ यांनी रात्री 11 वाजताच्या सुमारास हा बॅनर लावला होता. तसंच रात्री 1 वाजता येऊन ते बॅनर लावलेला असल्याची खातरजमा करून गेले होते. मात्र आज सकाळी हा बॅनर गायब झाला. मध्यरात्री उल्हासनगर महापालिका बंद असते. त्यामुळे मध्यरात्री हा बॅनर कोणीतरी चोरून नेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

‘उत्तर द्यायचं असेल, तर कामातून द्या, चोऱ्या करून नव्हे!’ असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. हा बॅनर म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावना असून शिवसेनेने आम्हाला डिवचल्यास आम्हीही तशाच पद्धतीने यापुढेही प्रत्युत्तर देऊ, असंही कपिल अडसूळ यांनी ठणकावलं आहे.

शिवसेनेचा बॅनर

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही उल्हासनगरात बॅनर लावून भाजपला डिवचले होते. कमजोर लोग ही शिकवा और शिकायत करते है, महान लोग तो हमेशा कर्म की वकालत करते है…! माझा नेता माझा अभिमान, असा मजकूर या बॅनरवर लिहिला होता. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्था निर्माण झाली होती. कल्याणचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेला या बॅनरवरून सुनावलेही होते. त्यानंतर थेट भाजपने शिंदे गटाच्या विरोधात बॅनर लावून शिंदे गटाला सुनावले. मात्र, आता हा बॅनरच चोरीला गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे.