
ठाणे : जिल्ह्यात 18 पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना शासकीय लसीकरण केंद्रा (Vaccination Center)वर कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बुस्टर डोस (Booster Dose) मोफत देण्यात येत आहे. जिल्ह्यात बुस्टर डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांची संख्या 44 लाख 39 हजार 167 इतकी असून लसीच्या दुसऱ्या डोसनंतर 6 महिने किंवा 26 आठवड्याचा कालावधी पूर्ण झालेले नागरिक प्रिकॉशन (Precaution) डोससाठी पात्र असणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.
बुस्टर डोस घ्यायला येताना नागरिकांनी दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र व नोंदणीकृत मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी तसेच थेट लसीकरण केंद्रांवर जाऊनही हा डोस घेता येईल, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी सांगितले. पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावेत असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गोटिराम पवार, आरोग्य व बांधकाम सभापती वंदना भांडे यांनी केले आहे.
देशभरात कोरोना व्हायरसपासून देशवासीयांची मुक्ती व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील 75 दिवस बूस्टर डोसची मोफत विशेष मोहीम राबण्याचं जाहीर केलं. आज 15 जुलैपासून ही मोहीम सुरू झाली. दादरच्या कोहिनुरमध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने याची सुरुवात करण्यात आली. नागरिक या बूस्टर डोस मोहिमेला चांगला प्रतिसाद देत आहेत. (Booster dose is available free of charge at the government vaccination center in Thane)