Kalyan Dahihandi : कल्याण डोंबिवलीत रंगणार थरांचा थरथराट, गोविंदा पथकं सज्ज; पोलीस प्रशासनानेही कसली कंबर

भाजपसह सेनेचे ठाकरे आणि शिंदे गट आपला स्वतंत्र दहीहंडी उत्सव ठेवणार आहेत तर तिकडे मनसे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचीही तयारी पूर्ण झालीये. लाखोंच्या हंड्या यंदा फुटणार असून, पोलीस प्रशासन देखील सज्ज झालंय.

Kalyan Dahihandi : कल्याण डोंबिवलीत रंगणार थरांचा थरथराट, गोविंदा पथकं सज्ज; पोलीस प्रशासनानेही कसली कंबर
कल्याण डोंबिवलीत रंगणार थरांचा थरथराट
Image Credit source: TV9
| Updated on: Aug 18, 2022 | 5:31 PM

कल्याण : राज्यात सरकार बदललं. राजकीय समीकरण बदलली. आता कोरोना संकट मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने दहीहंडीच्या माध्यमातून मतांचा जोगवा मिळवण्यासाठी राजकीय पक्ष (Political Parties) सज्ज झालेत. यंदा कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali)तही थरांचा थरथराट रंगणार आहे. भाजपसह सेनेचे ठाकरे आणि शिंदे गट आपला स्वतंत्र दहीहंडी उत्सव (Dahi Handi Festival) ठेवणार आहेत. मनसे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचीही तयारी पूर्ण झाली आहे. लाखोंच्या हंड्या यंदा फुटणार असून, पोलीस प्रशासन देखील सज्ज झालंय. कोरोनाच्या सावटानंतर यंदा निर्बंधमुक्त सण साजरे होत आहे. त्यात दहीहंडी म्हटलं की, बक्षिसांची लयलूट, मजा मस्ती नाच गाणी. मचा गया शोर सारे हे गाणं कोरोना संकटाच्या दीर्घ कालावधीनंतर यंदा खऱ्या अर्थाने जोशपूर्ण ठरणार आहे.

राज्यासह कल्याण डोंबिवली शहरात यंदा थरांचा थरथराट रंगणार आहे. राज्यात राजकीय दहीकाल्यानंतर अनेक गट झालेत. त्याचे पडसाद यंदा कल्याण डोंबिवलीतही दिसून येणार आहे. भाजपसह सेनेचे ठाकरे आणि शिंदे गट आपली स्वतंत्र दहीहंडी उत्सव ठेवणार आहेत तर तिकडे मनसे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचीही तयारी पूर्ण झालीये. लाखोंच्या हंड्या यंदा फुटणार असून, पोलीस प्रशासन देखील सज्ज झालंय.

कल्याण डोंबिवलीत कुठे, कितीची असणार दहीहंडी

कल्याण पश्चिमेला सदानंद चौक भाजपाची 11 लाखांची हंडी, तर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सेनेच्या ठाकरे गटाची 51 हजाराची हंडी असणार आहे. कल्याण पूर्वेत कुणाल पाटील फाउंडेशन आणि विजय दादा पाटील मित्र मंडळ यांच्यातर्फे 10 लाखांची हंडी, शंभर फुटी रोड परिसरात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून 11 लाखाची हंडी, डोंबिवली पश्चिमेला दीपेश म्हात्रे फाऊंडेशन तथा शिंदे गटातर्फे सम्राट चौक येथे लाखोंची हंडी, दीनदयाळ रोड येथे भाजपाची 22 लाखांची हंडी, डोंबिवली पूर्व बाजीप्रभू चौक येथे भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे लाखोंची हंडी, डोंबिवली पूर्वेकडील चार रस्ता येथ मनसेची दहीकाला उत्सवाचं आयोजन करण्यात आलाय.

दहीहंडीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन

डोंबिवलीत यावर्षी दिपेश म्हात्रे फाउंडेशन प्रस्तुत स्वराज्य दहीकाला महोत्सव 2022 साजरा होणार असून, यात कर्णबधीर मुलांना प्रतिकात्मक दहीहंडी फोडण्याचा मान दिला जाणार आहे. या मुलांना पहिली हंडी फोडताना पाहण्यासाठी डोंबिवलीकरांची गर्दी होणार आहे. लाखो रुपयांच्या बक्षिसांची ही लूट होणार असून सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत. तर यावर्षी मनसेने मात्र जरा वेगळी भूमिका मांडत चार थर लावूनच दहीहंडी फोडावी अशी विनंती पथकांना केलीये. बच्चे कंपनी यात बाळकृष्ण, राधा बनून आल्यास त्यांना मनसेच्या वतीने बक्षीस दिले जाणार आहेत. डोंबिवली पूर्वेकडील चार रस्ता परीसरात होणाऱ्या या उत्सवाला मनसेचे आमदार राजू पाटील यांची विषेश उपस्थिती असणार आहे.

दहीहंडी उत्सवासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज

कोरोना संकटानंतर नंतर यंदा निर्बंधमुक्त दहीकाला होत असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मूल यांची सुरक्षिततता देखील महत्वाची आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, नागरिकांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा पोलीस व्यक्त करत नागरिकांना आव्हान करत आहे. (Govinda team ready for Dahi Handi festival in Kalyan Dombivali)