जलकुंभाचं पाईप गंजून तुटून पडलं; या वसाहतीत इतके दिवस मिळालंच नाही पाणी

| Updated on: Mar 16, 2023 | 4:27 PM

या वसाहतीत असलेल्या जलकुंभाचे पाईप गंजून तुटून पडले. या वसाहतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. याबाबत कुटुंबीयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली.

जलकुंभाचं पाईप गंजून तुटून पडलं; या वसाहतीत इतके दिवस मिळालंच नाही पाणी
Follow us on

ठाणे : कल्याण पश्चिमेकडील बिर्ला महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या वसाहतीत मागील दहा ते अकरा दिवसापासून पाणी नाही. त्यामुळे तेथील कुटुंबीयांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या वसाहतीत असलेल्या जलकुंभाचे पाईप गंजून तुटून पडले. या वसाहतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. याबाबत कुटुंबीयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली. त्यानंतरही या विभागाकडून कर्मचाऱ्यांची आश्वासनावर बोळवण केली जात आहे. स्थानिक पोलीस कर्मचारी त्रस्त आहेत. कल्याण पश्चिमेकडील वसाहतीमधील इमारतीची दुरवस्था झाली आहे. याच इमारतीत जवळपास ७० ते ८० कुटुंबे राहत आहेत.

पाण्याअभावी नागरिकांचे हाल

या पोलीस वसाहतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. यामुळेच पालिका प्रशासनाकडून या वसाहतीत स्वच्छतेचा अभाव आहे. या वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी याच वसाहतीच्या परिसरात जलकुंभ उभारण्यात आला आहे. या जलकुंभावरून वसाहतीमधील रहिवाशांना पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी गंजून तुटून पडली आहे. यामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणीच नसल्याने या नागरिकाचे हाल झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

तुटलेल्या इमारतीची तावदाने काढली

सोसायटीच्या टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाक्यांना झाकणे नसल्याने या टाक्यांमध्ये कबुतरे आणि मांजरासारखे प्राणी देखील मरून पडतात. हेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागत असल्याची तक्रार देखील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. तुटलेल्या इमारतीच्या खिडक्यांची तावदाने काढण्यात आली. या तावदानाच्या मदतीने टाक्या तात्पुरत्या झाकल्या जातात. पण, या टाक्यांमधील दूषित पाणी प्यावे लागत असल्याने रहिवासी त्रस्त आहेत.

कार्यकारी अभियंता यांचा बोलण्यास नकार

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता संपदा मोहरीर यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला. पोलीस वसाहतीत पाणी नसल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. कर्मचाऱ्यांना या समस्येचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. परंतु, इतके दिवस होऊनही अद्याप या प्रकरणी कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस वसाहतीतील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या कुटुबातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही जण या प्रकारामुळे संतापले आहेत.