कल्याणमध्ये रस्त्यांची दुर्दशा, खड्ड्यांतून वाट काढताना प्रचंड हाल, कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा : भाजप

| Updated on: Jul 20, 2021 | 11:01 PM

कल्याण डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडा पडला आहे. कल्याणमध्ये रस्त्यांची दुर्दशा झाली असून खड्ड्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

कल्याणमध्ये रस्त्यांची दुर्दशा, खड्ड्यांतून वाट काढताना प्रचंड हाल, कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा : भाजप
अशा प्रकारे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.
Follow us on

ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडा पडला आहे. कल्याणमध्ये रस्त्यांची दुर्दशा झाली असून खड्ड्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. महापालिका क्षेत्रात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. या खड्डयांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. हेच खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडून 15 कोटी रुपयांचा खर्च केला जातोय. या खर्चावरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हा खर्च गरजेपेक्षा जास्त असल्याचा आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. (Kalyan roads worsen BJP demands action against contractor and government officials)

खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे

कल्याण डोंबिवली महापालिका दरवर्षी खड्डे भरण्यावर कोटय़वधी रुपये खर्च करते. यंदा खड्डे भरण्यासाठी महापालिकेने 15 कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. पालिकेकडून पावसाळ्य़ापूर्वी खड्डे भरण्याचे काम दरवर्षी केले जाते. मात्र गेल्या दोन दिवसात कल्याण डोंबिवलीत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

स्मरण पत्र देत लक्ष वेधले मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही

कल्याण मलंग रस्त्यावर एका ठिकाणी भला मोठा खड्डा पडला आहे. त्याची लांबी रुंदी जवळपास चार फूट इतकी आहे. हा खड्डा वाचविताना रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. महापालिकेने हा रस्ता जवळपास 45 कोटी रुपये खर्च करुन तयार केला आहे. या खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. यासाठी भाजप आमदार गायकवाड यांनी वारंवार पाठपुरावा केला. मे महिन्यात पावसाळा सुरु होण्यापूर्वीच त्यांनी रस्त्याच्या स्थितीबाबत पुन्हा स्मरण पत्र देत याकडे लक्ष वेधले होते. मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही.

कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे : गणपत गायकवाड

दरम्यान, कल्याण महानगर पालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. दोन वर्षांपूर्वी खड्ड्यांमुळे पाच जणांचा जीव गेला होता. मागील वर्षीसुद्धा खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले होते. याच कारणामुळे निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार करणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पंधरा कोटी रुपयांचा खर्च केला जातो आहे. प्रत्यक्षात हे काम फक्त एक कोटी रुपयांचे आहे. त्यामुळे अशा अवाजवी खर्चावरसुद्धा बंधनं आणली पाहिजेत अशी मागणी आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.

इतर बातम्या :

चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य, ठाणे-नाशिक मार्गावर सहा किलोमीटरच्या रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

ठाण्यात छमछम बंद, 15 लेडीजबार सील; महापालिकेची मोठी कारवाई

कळवा दुर्घटनेनंतर प्रवीण दरेकर आक्रमक, संबंधित अधिकाऱ्यांवर मोक्का लावण्याची मागणी, जखमींची विचारपूस

(Kalyan roads worsen BJP demands action against contractor and government officials)