
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काहीच ताकद नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तरी काही फरक पडणार नाही. भाजप नावाचा महापूर आला आहे. त्यात सर्व वाहून जातील, अशा शब्दात भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज-उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली होती. नारायण राणे यांच्या या विधानाचा मनसे नेते अविनाश जाधव यांनी खरपूस समाचार घेतला आहे. थोडे फार मैत्रीला जागा. राज ठाकरे होते म्हणून तुमचं तिकीट वाचलं, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी राणेंना सुनावलं आहे. तसेच जाधव यांनीही राणेंची खिल्ली उडवली आहे.
मनसे नेते अविनाश जाधव मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिलं. आमची ताकद नाही तर मग नारायण राणे तुम्ही कशाला आमची दखल घेता? नारायण राणे साहेबांना सांगू इच्छितो की, मैत्रीला थोडंफार जागा. हेच राज साहेब ठाकरे तुमचे तिकीट वाचवण्यासाठी होते. तुमच्यासाठी कोकणामध्ये सभा घेतली. सभा घेण्यासाठी तुम्ही राज साहेबांना किती फोन केले मला माहीत आहे, असं म्हणत अविनाश जाधव यांनी राणेंची खिल्ली उडवली.
तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी ही सभा आवश्यक होती. याचा अर्थात आमची महाराष्ट्रामध्ये ताकद काय हे कोणी सांगायची गरज नाही, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी राणेंची खिल्ली उडवली. दोन्ही ठाकरे बंधू ताकदवान आहेत. दोन्ही भावांची युती व्हावी ही महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील व्यक्तींची इच्छा आहे. ज्या दिवशी हे होईल तेव्हा आगीत तुम्ही तेल का टाकलं? असा सवाल भाजपवाले नारायण राणेंना नक्कीच विचारतील, असा चिमटाही त्यांनी काढला.
पहिल्याच पावसात रेल्वेची दाणादाण उडाली. त्यावरही अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन दिवसापूर्वी माझ्या फेसबुकवर एका महिलेने कमेंट केली होती. प्रचंड पाऊस आहे. फ्लॅट क्रमांक पाचवर जेव्हा आम्ही ट्रेन पकडतो तेव्हा त्या ठिकाणी वर शेड नाही. त्यामुळे महिलांना भिजतच ट्रेन पकडावी लागते.छत्री उघडू शकत नाही कारण की मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यासाठी हा पाहणी दौरा केला. पावसाळा सुरू झालेलं आहे. ठाणे स्टेशन हे महत्त्वाचं स्टेशन आहे. पण या स्थानकात 300 ते 400 मीटरपर्यंत छतच लावलें नाही. स्टेशनची दुरावस्था झाली असून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याकडे त्वरीत लक्ष दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.
एवढ्या गजबलेल्या स्टेशन परिसरात फ्लाटवरचे पत्रे तुटले आहेत. शौचालयही बंद आहे. एका ठिकाणी तर दोन पत्रे तारेने बांधलेले आहेत. पावसाळ्यात मोठं वादळ आलं तर स्टेशनवर मोठी दुर्घटना होऊ शकते. या सर्व गोष्टी आम्ही निदर्शनास आणून दिल्या आहेत. चार दिवसात यात बदल झाला नाही तर मनसे मोठं आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला. आमचं ठाणे स्टेशन हे देशातील पहिलं स्टेशन आहे. भारतीय इतिहासात ते शेवटचंही ठरू शकतं, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
प्रशासन निगरगठ्ठ आहे. खासदार आणि मंत्र्यांनी सांगूनही काम करायचं नसेल तर अशा अधिकाऱ्यांना चोप दिला पाहिजे. या ठाणे स्टेशनला हेरिटेजच्या दर्जा दिला पाहिजे. जगभरातील लोकांनी हे स्टेशन पाहायला आलं पाहिजे असं स्टेशन तुम्ही बनवलं पाहिजे. आम्ही ठाणेकर सांगून सांगून थकलो आहे. स्टेशवर यायलाही भीती वाटते, असंही ते म्हणाले.