
आज जैन समाजाने दादर येथे एकत्र येत कबुतर खान्यावरुन आक्रमक आंदोलन केलं. उच्च न्यायालयाच्या आदेशाने कबूतर खाना बंद झाल्यामुळे जैन समाज नाराज आहे. जैन समाजाच्या या आंदोलनानंतर ठाण्यातील मनसे नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “जैन समाज हा अतिशय शांतप्रिय समाज आहे. जे काही दादरला झाले ते आश्चर्यकारक आहे. जैन समाज कधीच हिंसाचार मानत नाही, त्यांनी जर असं काही केलं असेल तर नक्कीच त्याच्यापाठी राजकीय नेत्याचं पाठबळ असेल. त्यांनी फूस लावल्यामुळे अशी घटना घडली असेल. ज्या पद्धतीने त्यांनी कबूतर खान्याच्या बाबतीत केलंय, त्या पद्धतीने आम्ही माधुरी हत्तीला आणण्यासाठी करायचं का?” असा सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांनी विचारला.
“माधुरी हत्तीला आणण्यासाठी वेगळा नाही, मग आम्ही वन ताराला जायचं का?. तिथून पण असाच हिंसाचार करून आम्ही तिला सोडवायचं का? असा प्रश्न आमच्या समोर येतो. कबूतर खान्याच्या बाबतीत एक न्याय होणार असेल तर माधुरी हत्ती बाबतीत देखील न्याय होणे गरजेचे आहे” असं अविनाश जाधव म्हणाले.
मेसेज येतात की राज ठाकरे यांनी माधुरी हत्तीबाबत भूमिका घेतली पाहिजे
“मला अनेक फोन येतात, मेसेज येतात की राज ठाकरे यांनी माधुरी हत्तीबाबत भूमिका घेतली पाहिजे. हे दोन्ही विषय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झालेले आहेत. सुप्रीम कोर्टाला सांगूनच या दोन्ही विषयांवर मार्ग काढायला पाहिजे असं मला वाटतं” असं मत अविनाश जाधव यांनी व्यक्त केलं.
जैन समाजाकडून अशी अपेक्षा नव्हती
“अशा प्रकारचा हिंसाचार जैन समाज करेल अशा प्रकारची अपेक्षा नव्हती. पोलीस बघूया कशाप्रकारे कारवाई करतात. सरकारने यामध्ये पुढे येऊन माधुरी हत्तीचा विषय असेल किंवा कबूतर खान्याचा विषय असेल याबाबतीत सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा जावं. या ज्या गोष्टी आहेत याकडे सहानुभूतीने पहावं” असं ते म्हणाले.
तिथे आपला धर्म निभावावा
“कबुतरांमुळे दम्याचा आजार होतो अनेक डॉक्टर म्हणतात. शहराच्या बाहेर एक मोठा कबूतर खाना काढावा जिथे लोकं वस्ती नसेल अशा ठिकाणी आपला धर्म निभावावा. त्यांच्या समाजातील डॉक्टरांनी समोर यावं आणि म्हणावं की यामुळे आजार होत नाही” असं अविनाश जाधव म्हणाले.