TMC : पाणी साचून साथीचे रोग पसरल्यास टायर पंक्चर्स दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करणार

साथीचे रोग पसरण्याआधीच ठाणे महानगरपालिकेने प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी सदर सूचना टायर पंक्चर्स दुकानदारांना दिल्या आहेत. शहराचे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी दुकानदारांनी दुकानाबाहेर निकामी टायर्स न ठेवता ते टायर्स एकावर एक रचून ताडपत्रीने आच्छादीत करुन ठेवावेत किंवा एखाद्या बंदीस्त गोदामात ठेवावेत.

TMC : पाणी साचून साथीचे रोग पसरल्यास टायर पंक्चर्स दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करणार
ठाणे महापालिका
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 12:04 AM

ठाणे : पावसाळ्यात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने ठोस पाऊल उचलले आहे. या हद्दीतील टायर पंक्चर्स दुकानदारांनी दुकानासमोर उघड्यावर ठेवलेल्या निकामी टायर्समध्ये पावसाचे पाणी (Rain Water) साचते. यामुळे मलेरिया, चिकनगुनीया व डेंग्यू ताप पसरवणाऱ्या डासांची पैदास आढळून आल्यास अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई (Action) करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी दिले आहेत. पावसाळ्यात दरवर्षी टायर पंक्चर्स दुकानांबाहेर उघड्यावर ठेवलेल्या टायर्समध्ये किंवा दुकानांच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेत टाकलेल्या टायर्समध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे मलेरीया, चिकनगुनीया तसेच डेंग्यू ताप पसरविणाऱ्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे साथीचे रोग पसरुन शहरातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

साचलेल्या पाण्यात डास आढळल्यास दंडात्मक कारवाई होणार

या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात दुकानदारांनी दुकानाबाहेर उघड्यावर ठेवलेल्या निकामी टायर्समध्ये किंवा पाण्याच्या पिंपामध्ये पावसाचे पाणी साचले. तसेच या पाण्यात डास-अळी आढळून आल्यास तसेच यामुळे आजूबाजूच्या परिसरात मलेरीया, चिकनगुनीया तसेच डेंग्यू तापाचे डास आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार संबंधित दुकानदारावर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही कारवाई करण्यात येणार आहे.

साथीचे रोग पसरण्याआधीच ठाणे महानगरपालिकेने प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी सदर सूचना टायर पंक्चर्स दुकानदारांना दिल्या आहेत. शहराचे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी दुकानदारांनी दुकानाबाहेर निकामी टायर्स न ठेवता ते टायर्स एकावर एक रचून ताडपत्रीने आच्छादीत करुन ठेवावेत किंवा एखाद्या बंदीस्त गोदामात ठेवावेत. त्याचप्रमाणे पंक्चर टेस्टिंगसाठी ठेवलेले पाण्याचे टब दर दोन ते तीन दिवसांनी रिकामे करुन सुक्या कपड्याने कोरडे करुन पुन्हा भरावे, जेणेकरुन त्यामध्ये डास-अळ्यांची पैदास होण्यास अटकाव होईल अशाही सूचना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. (Punitive action will be taken against shopkeepers if water borne diseases spread)