Pradeep Purnekar Case : ठाणे जिल्हा प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येने हादरला, एकनाथ शिंदेंकडून काय अपेक्षा? त्यावर मुलाने दिलं असं उत्तर
Pradeep Purnekar Case : ठाणे जिल्हा पुन्हा एकदा राजकीय हत्येने हादरला आहे. ठाकरे गटाचे शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. भररस्त्यात फायरिंग आणि वार करुन ही हत्या करण्यात आली.

ठाणे जिल्हा पुन्हा एकदा राजकीय हत्येने हादरला आहे. काल ठाण्यातील ठाकरे गटाचे शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा ठाण्यात अशा प्रकारची हत्या झाली आहे. प्रदीप पुर्णेकर यांच्या मुलाने न्याय देण्याची मागणी केली आहे. “या हत्येमागे काय कारणं आहेत त्याची कल्पना नाही. निवडणुकीमुळे, पक्षामुळे कशामुळे हत्या झाली, काही माहित नाही” अशी प्रतिक्रिया प्रदीप पुर्णेकर यांच्या मुलाने दिली. “खूप वेळा माझ्या वडिलांनी सर्वांसाठी सर्व काही केलं. दुसऱ्यांची नशा सोडवण्यासाठी प्रयत्न केले. ड्रग माफिया या हत्येमागे असू शकतो, कोणीही असू शकतो” असं प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा बोलला.
“काल उपोषण आंदोलन होतं. पप्पा कलेक्टर ऑफिसला जाणार होते. पण पोलिसांनी त्यांना समजावलं. त्यामुळे काल दुपारी ते घरीच होते” असं प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा बोलला. तुम्ही फडणवीसांकडे काय मागणी कराल? यावर पूर्णेकर यांचा मुलगा म्हणाला की, “मला सीएम सरांना एवढच सांगायचं आहे की, प्लीज माझ्या डॅडला न्याय द्या. जे कोणी यामागे आहेत, त्या सर्वांना अटक करा. काहीही असेल तरी आम्हाला सर्व क्लियर करा. आमची फॅमिली कधी इतक्या घाण परिस्थितीतून गेलेली नाही. आम्हाला काय त्रास होतोय, आम्हाला माहितीय”
उद्धव ठाकरेंचा फोन आलेला का?
उद्धव ठाकरेंचा फोन आलेला का? त्यावर त्याने ‘फोन आलेला की नाय, मला काही माहिती नाही’ असं उत्तर दिलं. “माझे वडिल निष्ठावंत होते हे सर्वांना माहित आहे, ते शिवसेनेत असातानाच ऑफ झाले” असं प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा बोलला. एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? यावर प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा म्हणाला की, “उपमुख्यमंत्र्यांनी पण काहीतरी बोललं पाहिजे. आम्हाला पण त्यांच्या मदतीची गरज आहे”
कशी झाली हत्या?
ठाण्याच्या मनोरमा नगर परिसरातील रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. मास्क घालून आलेल्या आरोपींनी प्रदीप पूर्णेकर यांच्यावर चार राऊंड फायरिंग केली. त्यापैकी दोन गोळ्या पुर्णेकर यांना लागल्या. गोळीबारानंतर हल्लेखोरांकडून धारदार शस्त्रानेही पुर्णेकर यांच्यावर वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत पुर्णेकर यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान प्रदीप पुर्णेकर त्यांची प्राणज्योत मालवली.
