चवीसाठी चिकन खाल्लं पण संपूर्ण कुटुंबासोबत नको ते घडलं, 3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू आणि…

चिकन खाल्ल्यानंतर मीरा भाईंदर इथं राहणारे एकाच कुटुंबातील पाच जण अचानक आजारी पडले. त्यापैकी तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्नातून विषबाधा झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

चवीसाठी चिकन खाल्लं पण संपूर्ण कुटुंबासोबत नको ते घडलं, 3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू आणि...
chicken
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 08, 2025 | 2:13 PM

मीरा-भाईंदरमधल्या बजरंग नगर इथं राहणारे एकाच कुटुंबातील पाच जण अचानक आजारी पडले. यामध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीने आपला जीव गमावला. तर इतर चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्नातून विषबाधा झाल्याने कुटुंबातील सर्व सदस्य आजारी पडले, असं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील रविवारी संध्याकाळी बाजारातून चिकन घेऊन आले. ते चिकन घरी शिजवण्यात आलं आणि संपूर्ण कुटुंबाने रात्रीच्या जेवणात भात, उकडलेली अंडी आणि वडापावसोबत मिसळून खाल्लं. जेवल्यानंतर काही वेळातच कुटुंबातील महिला, तीन मुली (3, 6 आणि 8 वर्षांच्या) आणि मेहुण्याला उल्ट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. या सर्वांना रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.

रमेश मोर्या, नीलम मोर्या आणि राजकुमार मोर्या यांच्यावर मीरा भाईंदरमधल्या डॉ. भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चाहत मोर्या आणि अनामिका मोर्या यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे तीन वर्षीय दिपाली मोर्याचा मृत्यू झाला. चिमुकलीचं शवविच्छेदन करण्यात आलं असून प्राथमिक अहवालात मृत्यूचं कारण विषबाधा झाल्याचं समोर आल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जितेंद्र कांबळे यांनी दिली.

विषबाधेचं नेमकं कारण स्पष्ट न झाल्यामुळे पोलिसांनी प्रकरण संशयास्पद मानून फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं आहे. घरातील जेवणाचे सॅम्पल्स फॉरेन्सिक टीमने तपासासाठी घेतले आहेत. याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. कांबेळ म्हणाले, “सुरुवातीच्या तपासात बाजारातून आणलेल्या चिकनमध्ये कोणतेही विषारी पदार्थ असल्याचं दिसत नाही. इतर कोणत्या अन्नातून विषबाधा झाली का, याचा तपास आम्ही करत आहोत. वैद्यकीय तपासणी आणि अहवाल आल्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल.” या संपूर्ण घटनेचा तपास मीरा भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे करत आहेत.

या घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस आणि प्रशासनाने या परिसरातील लोकांना सध्या तरी खाण्यापिण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचं आणि संशयास्पद लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.