
कल्याण डोंबिवलीचा महापौर कोणाचा होणार हे आता स्पष्ट झाले आहे. महापौर पदासाठी शुक्रवारी ( 30 जानेवारी 2026 ) शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थवील-चौधरी यांनी अर्ज भरला असून त्यांची बिनविरोध निवड पक्की झाली आहे. तर उपमहापौर पदासाठी भाजपाचे राहुल दामले यांनी अर्ज भरला आहे. या निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. कल्याण-डोंबिवलीला महापौर हर्षाली चौधरी थविल यांनी आपला प्रवास कथन केला आहे. एक वायरमनची मुलगी ते दोनदा नगरसेवक आणि आता महापौर म्हणून त्या कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रथम नागरिक होणार आहेत. विरोधक नसल्याने ३ फेब्रुवारी रोजी हर्षाली चौधरी अधिकृतपणे महापौर पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.
आपला प्रवास कथन करताना हर्षाली चौधरी यांनी सांगितले की, माझे वडील एमएसईबीत वायरमन होते. मला सर्वजण वायरमनची मुलगी म्हणून हाक मारायचे. आज माझे वडील हयात नाहीत. मला जे पद मिळालेला आहे संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाले आहे.तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे तसेच आमदार आणि जिल्हाप्रमुख आणि जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवलाय यासाठी मी सगळ्यांचे आभार मानत आहे. मी आता विकास कामावरती भर देणार आहे. रखडलेले प्रोजेक्ट नव्याने सुरू करणार आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि आरोग्यासह इतर विकास कामाला प्राधान्य असणार आहे.
‘लाडकी बहीण’ म्हणून मी महिला सक्षमीकरणाचे काम करणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर ‘लाडकी बहिण’ म्हणून जो विश्वास दाखवला त्यामुळे लाडक्या बहिणीला सक्षम करणार आहे. माझे वडील वायरमन होते. एमएसईबीमध्ये कामाला होते. 93 साली आम्ही या ठिकाणी आलो. या ठिकाणी आम्हाला 30 ते 40 वर्ष झाले आहेत. याआधी मला प्रत्येक जण बोलायचे वायरमनची मुलगी. त्यांच्यामुळे माझा हा प्रवास सुरू झाला.माझ्या प्रवासाला माझ्या वडिलांची पुण्याई कामी आली. वडिलांनी मला साथ दिली. वडिल असते तर आनंद वेगळा असतो, असे भावूक होत हर्षाली चौधरी यांनी सांगितले.
माझे सासू-सासरे भाऊ आणि माझी पती देखील माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले. मुख्य म्हणजे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्यामुळे मी राजकारणात या ठिकाणी पोहोचले असेही हर्षाली चौधरी म्हणाल्या. पहिल्यांदा मी निवडून आली तेव्हा मी वयाने लहान होती. मात्र दुसऱ्यांदा आता मी निवडून आले आहे. त्यामुळे विकासाचे ध्येय घेऊन मी या ठिकाणी उभी आहे. माझा प्रेग्नेंसीचा प्रॉब्लेम झाला.. सहा महिन्याचे बाळ आज जगात नाही. त्यावेळेस माझी मनाची मन:स्थिती डगमगलेली होती. दोन महिन्यानंतर वडीलही मला सोडून गेले. हा प्रवास माझ्यासाठी खूप मोठा कठीण होता असेही हर्षाली चौधरी म्हणाल्या.
सगळ्या गोष्टी सुरू असताना माझ्या पती विजय चौधरी मला माझ्या जुन्या ठिकाणी म्हणजेच माझे बालपण जेथे गेले, त्या ठिकाणी मला घेऊन आले, पुन्हा संधी मिळाली. माझे पतीची देखील खूप मोठी साथ मला मिळाली आहे. दुसऱ्यांदा पक्षाने देखील माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी नगरसेवक झाले आणि माझ्या पक्षातील सर्वांनी मला आज महापौर बनवले आहे आणि माझ्यावर इतका विश्वास दाखवला आहे. त्यामुळे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करीत असल्याचे त्या म्हणाल्या.