खेळता खेळता शेततळ्याजवळ गेल्या, अचानक एकीचा पाय घसरला अन् मग… कोल्हापूर सुन्न

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात हुंदळेवाडी येथे खेळता खेळता शेततळ्यात पडल्याने ३ शाळकरी मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

खेळता खेळता शेततळ्याजवळ गेल्या, अचानक एकीचा पाय घसरला अन् मग... कोल्हापूर सुन्न
Kolhapur girl
| Updated on: May 26, 2026 | 10:06 AM

कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कोवाडनजीक असलेल्या हुंदळेवाडी येथे खेळता खेळता पाय घसरून शेततळ्यात पडल्याने तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण चंदगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. स्वराली संतोष नाईक, धनुष्का मारुती सांबरेकर आणि रिया बाळकृष्ण सांबरेकर अशी मृत पावलेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. या तिन्ही मुली एकमेकांच्या जवळच्या नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.

खेळता खेळता घडला अनर्थ

मिळालेल्या माहितीनुसार, या मुली नेहमीप्रमाणे गावातील शेताच्या परिसरात खेळण्यासाठी गेल्या होत्या. खेळत असताना हुंदळेवाडी येथील त्या एका शेततळ्याजवळ पोहोचल्या. मात्र, खेळण्याच्या नादात अचानक एका मुलीचा पाय घसरला आणि ती शेततळ्यात पडली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर दोन मुलीही एकापाठोपाठ एक शेततळ्याच्या पाण्यात पडल्या. शेततळ्याची खोली जास्त असल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तिघीही पाण्यात बुडू लागल्या.

४ वर्षांच्या भावाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

या तिन्ही मुलींसोबत रियाचा ४ वर्षांचा लहान भाऊदेखील तिथे खेळत होता. आपल्या बहिणींना पाण्यात बुडताना पाहून या चिमुरड्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्याचा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून जवळच शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने शेततळ्याच्या दिशेने धाव घेतली. शेतकऱ्यांनी तात्काळ पाण्यात उड्या मारून तिन्ही मुलींना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दुर्दैवाने पाण्यात गुदमरल्यामुळे तिघींचाही जागीच मृत्यू झाला.

त्याचिमुरड्याने आरडाओरडा केल्यानंतर आम्ही धावत गेलो. मुलींना बाहेर काढले, पण अतिशय दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. या घटनेने गाव सुन्न झाले आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक प्रत्यक्षदर्शीने दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. एकाच कुटुंबातील आणि नात्यातील तीन निष्पाप मुलींचा असा अकाली मृत्यू झाल्याने हुंदळेवाडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Follow Us