Supriya Sule : दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं हे..भाऊबीजेच्या दिवशी सुप्रिया सुळेंनी खास अजितदादांसाठी लिहिली काळजाला भिडणारी पोस्ट
Supriya Sule : तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. राजकीय मतभेद, मतभिन्नता निर्माण झाली. अजित पवार आणि सुप्रिया सुळे दोघांचे पक्ष, आघाडी बदलली. पण पवार कुटुंबातील आपुलकीचे बंध कायम होते.

दरवर्षी दिवाळीच्या सणामध्ये पहिलं लक्ष्मीपूजन, मग पाडवा आणि त्यानंतर भाऊबीज येते. हा भाऊबीजेचा दिवस खास असतो. आज भाऊबीज आहे. बहिण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा दिवस. दरवर्षी या दिवशी बहिण भावाला ओवाळते, दोघांमधील नात्याचा बंध अधिक दृढ होतो, आपलुकी, प्रेम वाढतं. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटी, नेतेमंडळींसाठी सुद्धा भाऊबीजेचा दिवस विशेष असतो. यंदाची भाऊबीज ही सुप्रिया सुळेंच्या मनाला वेदना देणारी आहे, कारण यंदाच्या भाऊबीजेला अजितदादा पवार कुटुंबात नाहीयत. यावर्षी 28 जानेवारीला बारामती एअरपोर्ट जवळ अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. त्यांचं विमान कोसळलं. या दुर्देवी दुर्घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाला. हा फक्त पवार कुटुंबासाठीच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रासाठी मोठा धक्का होता. कारण या अपघातात महाराष्ट्राने एका खंबीर, दूरदृष्टी असलेलं नेतृत्व कायमसाठी गमावलं.
तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. राजकीय मतभेद, मतभिन्नता निर्माण झाली. अजित पवार आणि सुप्रिया सुळे दोघांचे पक्ष, आघाडी बदलली. पण पवार कुटुंबातील आपुलकीचे बंध कायम होते. बहिण-भावाच्या नात्यातील प्रेमाचा ओलावा कायम होता. आज भाऊबीजेचा दिवस असून सुप्रिया सुळे यांना अजितदादांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय. सुप्रिया सुळे यांनी भाऊबीजेची एक पोस्ट करुन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिलीय. सुप्रिया सुळे यांनी भाऊबीजेचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केलाय. यात त्या अजित पवारांना ओवळत असून आसपास पवार कुटुंबीय आहेत. या व्हिडिओमध्ये पार्थ पवार सुद्धा दिसतात.
तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस
“दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली. आपलं एकत्र येणं, गप्पा, हसणं… आम्हा बहिणींच्या घोळक्यात हरखून गेलेला तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस. तेव्हा अगदी सहज वाटणारे ते क्षण आज किती मोलाचे वाटतात”
“दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील” असं सुप्रिया सुळे यांनी इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलय.