Nashik| ममदापुरात पर्यटन निवास सुरू; भुजबळांच्या हस्ते उद्घाटन, रोजगारांच्या संधी निर्माण होणार

| Updated on: Nov 19, 2021 | 4:20 PM

पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, राजापूर परिसरात 41 गाव पाणीपुरवठा प्रकल्प योजना शासनाच्या मंजुरीसाठी असून, लवकरच या योजनेच्या कामाला सुरुवात होईल.

Nashik| ममदापुरात पर्यटन निवास सुरू; भुजबळांच्या हस्ते उद्घाटन, रोजगारांच्या संधी निर्माण होणार
येवला तालुक्यातील ममदापूर संवर्धन राखीव पर्यटन निवास व्यवस्थेचे उद्घाटन छगन भुजबळ यांनी केले.
Follow us on

नाशिकः प्राणी, पक्षी यासारख्या वन्यजीवांना वाचविण्यासह वनपर्यटनाच्या माध्यमातून विकास साधणारे विविध प्रकल्प जगभरात सुरू झाले आहेत. आपल्यालाही त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज आपण येवला तालुक्यातील ममदापूर संवर्धन राखीव पर्यटन निवास व्यवस्थेचे उद्घाटन करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. येवला तालुक्यातील ममदापूर संवर्धन राखीव पर्यटन निवास व्यवस्थेचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर, पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय सभापती वसंत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, सरपंच सुरेखा जेजुरकर, सुनील पैठणकर,बाळासाहेब दाणे उपस्थित होते.

कृषी पर्यटनातून रोजगार

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येथील विकासकामांचा पर्यटकांना अधिक फायदा होईल. वनविभागाच्या परिसरात शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, परिसराचे संवर्धन करण्यासाठी आपण योगदान देत आहात ही अतिशय स्तुत्य बाब आहे. सृष्टीचे संतुलन बिघडले तर त्याचा परिणाम सर्व घटकांना सोसावा लागतो. त्यामुळे सृष्टीने निर्माण केलेला प्रत्येक घटक वाचविण्याची आपली जबाबदारी आहे. वन्यप्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी परिसरात समित्या स्थापन करण्यात आल्या असून, परिसरातील नागरिकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वस्तूंची निगा राखण्याची जबाबदारी ओघानेच येथील गावकऱ्यांची असून पर्यटकांचे आदरातिथ्य करावे त्यातून परिसरातील नागरिकांना उत्पन्न मिळणार आहे. तसेच वनपर्यटनासोबत आता कृषी पर्यटनातूनही नागरिकांना रोजगार मिळणार आहे.

देवना प्रकल्पाला मान्यता

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, देवना येथील प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून कोरोनामुळे निधीवर निर्बंध असल्याने हे काम अजून सुरू झालेले नाही. आता पुन्हा निधी प्राप्त करून लवकरच हे काम देखील सुरू होईल. वनविभागाचे कायदे अतिशय कडक असल्याने वनविभाग परिसरात विकासाची कामे करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वनविभागाच्या परवानग्यांअभावी अनेक कामे रखडली जातात. त्याला अधिक वेळ लागतो. मात्र अडचणीतुन मार्ग आपण काढत असून जिल्ह्यात वनविकासाची कामे केली जात आहे, असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

41 गाव पाणीपुरवठा योजना लवकरच

राजापूर परिसरात 41 गाव पाणीपुरवठा प्रकल्प योजना शासनाच्या मंजुरीसाठी असून, लवकरच या योजनेच्या कामाला सुरुवात होईल. त्या कामाला अधिक गती देण्यात येऊन विकासाचा राहिलेला हा बॅकलॉक आपण भरून काढू, असे सांगून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्री गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी बोलताना आमदार नरेंद्र दराडे म्हणाले की, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून राजापूर ममदापूर परिसरात विकास विकास कामे मार्गी लावली आहे. काळवीट संवर्धन क्षेत्र असलेल्या या परिसरात पर्यटन निवास व्यवस्था करण्यात आली आहे. ही काळाची गरज होती. मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्यात आला आहे. यापुढील काळातही येथील विकासासाठी आपण कटिबद्ध, असे त्यांनी यावेळी सांगितले.

इतर बातम्याः

Special Report| ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचा धगधगता अंगारमळा; संघर्ष, क्रौर्य आणि सत्तेची पोळी!

छगन भुजबळ यांच्या हस्ते अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या ‘प्राजक्त प्रभा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन