
मानसिक आजार आणि अंधश्रद्धेचा विळखा किती जीवघेणा ठरु शकतो, याचा प्रत्यय नुकताच आला आहे. महाराष्ट्रातील एका २५ वर्षीय तरुणाने बाहेरची बाधा दूर करण्याच्या नादात मध्य प्रदेशात धाव घेतली. मात्र तिथेही त्याच्या मनातील भीती दूर झाली नाही. स्वप्नात येणाऱ्या तीन महिला आपल्याला जगू देत नाहीत, या काल्पनिक भीतीला कंटाळून या तरुणाने विष प्राशन करून जीवन संपवले. ही घटना मध्यप्रदेशातील खलवा पोलीस स्टेशन हद्दीतील अंबापत गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय रामदास नावाच्या तरुणाची गेल्या काही काळापासून मानसिक स्थिती खालावली होती. रामदासला सतत स्वप्नात तीन महिला दिसत होत्या. ज्या त्याला प्रचंड घाबरवत असत. मला त्या तीन महिला शांतपणे जगू देत नाहीत असे तो वारंवार आपल्या कुटुंबियांना सांगायचा. हा प्रकार कोणत्याही वैद्यकीय उपचाराने बरा होत नव्हता. त्यामुळे कुटुंबियांनी जादूटोणा असावा असा समज करुन घेतला.
रामदासचा हा आजार तांत्रिक विधीने बरा होऊ शकतो, असे कोणाकडून तरी समजल्यानंतर कुटुंबियांनी त्याला मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील खलवा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अंबापत गावात आणले. तिथे एका बाबाकडे त्याचे उपचार सुरू होते. काही काळ अंबापत येथील आपल्या बहिणीच्या घरी राहून त्याने तांत्रिकाचा सल्ला घेतला. सुरुवातीला तीन महिने त्याची प्रकृती सुधारली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याला पुन्हा तीच भयानक स्वप्न पडत होती.
तसेच रामदासचा भाऊ प्रकाश याने दिलेल्या माहितीनुसार, रामदास पुन्हा त्याच मानसिक दडपणाखाली आला होता. गुरुवारी अचानक तो घरातून बाहेर पडला. गावाजवळील जंगलात गेला. तिथे त्याने विषारी पदार्थ प्राशन केला. प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेवर वैद्यकीय तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, स्वप्नात काही दिसणे किंवा कानात आवाज येणे हे स्किझोफ्रेनिया किंवा हॅल्युसिनेशन (Hallucination) यांसारख्या गंभीर मानसिक आजाराचे लक्षण असू शकते. अशा रुग्णांना तांत्रिकाकडे नेण्याऐवजी योग्य मानसोपचारतज्ज्ञांकडे नेणे आवश्यक असते. अंधश्रद्धेमुळे उपचाराला उशीर झाल्याने अशा दुर्घटना घडतात. याप्रकरणी खलवा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.