‘त्या’ मंत्र्यांना मंत्रालयात जाऊन दारु पाजू : तृप्ती देसाई

"चंद्रपूरची दारुबंदी हटविण्यासाठी जे मंत्री पुढाकार घेतील त्यांना भूमाता ब्रिगेडच्या महिला मंत्रालयात जाऊन दारु पाजतील", असे तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत (Trupti Desai on Chandrapur alcohol ban).

  • पांडुरंग रायकर, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 10:14 AM, 18 Jan 2020
'त्या' मंत्र्यांना मंत्रालयात जाऊन दारु पाजू : तृप्ती देसाई

पुणे : “चंद्रपूरची दारुबंदी हटविण्यासाठी जे मंत्री पुढाकार घेतील त्यांना भूमाता ब्रिगेडच्या महिला मंत्रालयात जाऊन दारु पाजतील”, असा इशारा भूमाता ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी राज्य सरकारला दिला आहे (Trupti Desai on Chandrapur alcohol ban). महाविकास आघाडी सरकार चंद्रपूरमधील दारुबंदी हटवण्याच्या तयारीत आहे. गेल्या पाच वर्षात शेकडो कोटींचा महसूल बुडाल्याने सरकार दारुबंदी हटवण्याच्या विचारात आहे. मात्र, तृप्ती देसाई यांनी या दारुबंदी उठवण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे (Trupti Desai on Chandrapur alcohol ban).

“महसूलसाठी अनेक चांगले पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. चंद्रपूरची दारुबंदी हटवू नये, महिलांचा शाप असलेला पैसा महसूल म्हणून स्वीकारू नये”, असे तृप्ती देसाई म्हणाल्या. “मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी बिहार आणि गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात दारूबंदी करावी”, अशी विनंती तृप्ती देसाई यांनी केली आहे.

चंद्रपूरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून दारुबंदी आहे. एप्रिल 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू करण्यात आली होती. त्यावेळी जवळपास 200 दारु विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले होते.

दारुबंदीमुळे गेल्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात 200 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. बेकायदा विक्रीमुळे महसूल बुडत असल्याचं निरीक्षण समोर आल्यानंतर महसूलवाढीसाठी ठाकरे सरकारने दारुबंदी हटवण्याचा फंडा वापरला आहे.

विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांतील तूट भरुन काढण्याचीही जबाबदारी असल्यामुळे राज्यात दारु विक्रीची वेळही तासाभराने वाढवण्यात येणार आहे.

दरम्यान, चंद्रपूरमधील दारुबंदी उठवण्याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी सरकारला उत्पन्न वाढवण्यासाठी चांगल्या मार्गांचा उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे. सरकारने उत्पन्न वाढीसाठी पापाच्या कराचा आधार घेऊन हजारो कुटुंबं उद्ध्वस्त करु नयेत, असेही ते म्हणाले आहेत. त्यानंतर आता तृप्ती देसाई देखील विरोध करत आहेत.