कोरोना काळात तुकाराम मुंढेंनी चांगलं काम केलं: नितीन गडकरी

| Updated on: Jan 30, 2021 | 9:10 PM

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवरून आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागपूर महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला होता. | Tukaram Mundhe

कोरोना काळात तुकाराम मुंढेंनी चांगलं काम केलं: नितीन गडकरी
तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदलीही झाली होती. मात्र, आता नितीन गडकरी यांनीच तुकाराम मुंढे यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत
Follow us on

नागपूर: कोरोनाच्या काळात नागपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी चांगले काम केले, अशी प्रशंसा नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवरून आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागपूर महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला होता. यामध्ये भाजपचे विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी आणि संदीप जोशी आघाडीवर होते. याच वादातून तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदलीही झाली होती. मात्र, आता नितीन गडकरी यांनीच तुकाराम मुंढे यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Nitin Gadkari praises Tukram Mundhe work in Nagpur)

नितीन गडकरी हे शनिवारी नागपूर मनपाने आयोजित केलेल्या कोरोना योद्धा सन्मान या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या काळात आयुक्त तुकाराम मुंढे आणि आमदारांनी चांगले काम केल्याची पोचपावती दिली. तसेच आगामी काळात नागपूर महानगरपालिकेने औषधी बँक तयार करावी. या बँकेत अत्यावश्यक औषधांचा साठा असावा, अशी सूचनाही यावेळी गडकरी यांनी केली.

मी कार्यकर्त्यांना आधी नीट घर चालवायला सांगतो: गडकरी

पार्टीसाठी जीवन देतो, असं म्हणणारे अनेक लोक माझ्याकडे येतात. मी त्यांना सांगतो आधी घर नीट चालवा. जे कार्यकर्ते घर नीट चालवू शकत नाही ते पार्टी काय चालवणार. त्यामुळे आधी घराची जबाबदारी सांभाळणे गरजेचे असल्याचा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला.

…अन् संतापलेले तुकाराम मुंढे सभागृहातून निघून गेले

कोरोना उपाययोजनांच्या अंमलबजावणीवरुन आयुक्त तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये सातत्याने खटके उडत असल्यामुळे जून महिन्यात त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मात्र, त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती.

भाजपचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी हे आवाज चढवून सभेत आयुक्तांसोबत बोलत होते. जर अशाच अविर्भावात भाजपचे नगरसेवक बोलणार असतील, तर मी सभेतून निघून जाईन, असे मुंढे यांनी ठणकावले. त्यावर भाजपचे दयाशंकर तिवारी यांनी ‘सभागृहातूनच काय नागपुरातूनही चालते व्हा’ असे उत्तर त्यांना दिले. तर काँग्रेसचे नगरसेवक हरिश ग्वालवंशी यांनी संत तुकाराम यांच्या नावाला महापालिका आयुक्त मुंढे यांनी त्यांच्या कृतीमुळे कलंक लावू नये, असे विधान केले. नगरसेवकांच्या या अरेरावीमुळे तुकाराम मुंढे प्रचंड व्यथित झाले. त्यामुळे तुकाराम मुंढे रागाच्या भरात सभागृहातून निघून गेले होते.

संबंधित बातम्या:

साडेनऊच्या ठोक्याला तुकाराम मुंढे कार्यालयात, हजेरीचं पंचिंग मशीन बिघडलं, केबिनबाहेर जुन्या आयुक्तांची पाटी बदलताना धावपळ 

तुकाराम मुंढेंना सॅल्यूट कसा मारायचा? सीनियरकडून ज्युनिअरला प्रशिक्षण, वेळेआधीच मुंढे कार्यालयात

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, नागपूरचे धडाकेबाज महापालिका आयुक्त आता मुंबईत!

(Nitin Gadkari praises Tukram Mundhe work in Nagpur)