Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनंतर आणखी एका अधिकाऱ्याची होतेय चर्चा; चक्क अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची उडवली होती झोप
तुकाराम मुंढेंनंतर आणखी एका अधिकाऱ्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. या अधिकाऱ्याने चक्क अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची झोप उडवली होती.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात कारवाईचा धडाका लावला आहे. डॅशिंग अधिकारी मुंढे मुंबईसह महाराष्ट्रातील विविध आस्थापनातील त्रुटी आणि उल्लंघनावर थेट कारवाई करत आहेत. महाराष्ट्र कॅडर 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईवर बॉलिवूड मंडळी देखील फिदा झाली आहेत. तुकाराम मुंढे यांची जोरदार चर्चा सुरू असताना एका जुन्या अधिकाऱ्याची देखील जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कारभार हातात घेतल्यानंतर मुंढे यांनी अवघ्या तीन महिन्यात स्वच्छतेच्या मानकांचे उल्लघंन करणाऱ्या उद्योग क्षेत्रातील मालकांची झोप उडवली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने आतापर्यंत अनेक नामांकित रेस्टॉरंट, आइस्क्रिम पार्लर आणि डेअरीचे लायसन्स रद्द केले आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्रालयासहित कोर्टाच्या कँटीनवरही कारवाई केली होती. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धडाका सुरू असताना एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची झोप उडवणाऱ्या अधिकाऱ्याचीही जोरदार चर्चा होऊ लागली आहे. गोविंद राघो खैरनार असे या अधिकाऱ्याचे नाव.
खैरनार यांनी अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली होती. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना ‘बुलडॉझर मॅन’ या नावाने ओळखले जाऊ लागले होते. खरंतर खैरनार हे 1964 साली राज्य सरकारच्या एका विभागात लिपीक म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर मेहनतीने महानगरपालिकेचे उपायुक्त बनले. या पदाचा कारभार हातात घेतल्यानंतर अवैध फेरीवाले आणि राजकीय नेत्यांशी संबंधित बांधकामांवर कारवाईला सुरुवात केली होती.
1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटानंतर दाऊदच्या बेकायदेशीर इमारतींची यादी तयार करण्यात आली होती. या यादीत दाऊदने पत्नीच्या नावावर बांधलेली एक अलिशान मालमत्ता होती. या इमारतीत स्विमिंग पूल, इटालयिन संगमरवी फरशी यासहित अनेक आधुनिक सोयीसुविधा होत्या. या इमारतीचं बांधकाम एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखे होते. एकेदिवशी खैरनार हे पथकासह इमारतीच्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर थेट पथकाला आदेश देऊन इमारत पाडण्यास सुरुवात केली. त्यांच्या पथकाने इमारत दिवसभरात पूर्णपणे जमीनदोस्त केली. त्यानंतर खैरनार यांना झवेरी बाजारात आरोपी टायगर मेननची मालमत्ता सापडली. भारतात असताना मेननने याच इमारतीमधून कार्यालय चालवलं होतं. त्यांनी मेननच्या इमारतीवरही कारवाई केली. एका कारवाईदरम्यान दाऊदचा साथीदार सलीम तलवार याने त्यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता. दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील राजकीय नेत्यांनी त्यांच्या कारवाईचा विरोध केला होता. त्यानंतरही त्यांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला होता. पुढे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आलं होतं.