Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं

Tukaram Mundhe: नागपूर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांची चांगलीच खरडपट्टी काढतानाचा तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते नेमकं काय म्हणाले, ते जाणून घ्या..

Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं
Tukaram Mundhe
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 24, 2026 | 1:50 PM

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यशैलीसाठी ओळखले जातात. नियमांबाबत कोणतीही तडजोड न करणाऱ्या मुंढेंचा असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाच्या पद्धतीपासून कार्यालयातील शिस्तीपर्यंत अनेक मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत सुनावल्याचं दिसत आहे. तुकाराम मुंढेंनी सर्वप्रथम विभागांतील संवादाचा अभाव आणि कामातील ढिसाळपणा यावर नाराजी व्यक्त केली. परिस्थिती अशी आहे की आपण दहा दिशेला तोंडं करून बसलोय, ते मला नकोय.. असं म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये आणि आंतरविभागीय पातळीवर संवाद असण्याची गरज स्पष्ट केली.

अधिकाऱ्यांची खरडपट्टी

केवळ एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर कागद पाठवणं आणि प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा करणं पुरेसं नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. “कागदं पळवणं एवढंच आपलं काम नाही. त्याच्यावर जे अपेक्षित काम आहे, जे रिझल्ट हवंय, त्यासाठी आपण काम केलं पाहिजे,” असं मुंढेंनी सुनावलं. प्रक्रिया महत्त्वाची आहे, मात्र त्या प्रक्रियेतून नागरिकांना प्रत्यक्ष परिणाम मिळाला पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला. प्रशासनातील प्रत्येक विभागाने एकमेकांशी समन्वय साधून काम केलं पाहिजे. अन्यथा सामान्य नागरिकांना विनाकारण कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात आणि त्यांचा वेळ वाया जातो. “असा लोकांना नाहक त्रास दिला तर मला चारणार नाही”, असा इशाराही त्यांनी दिल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

जीन्सवरूनही कर्मचाऱ्यांना तंबी

कामाच्या पद्धतीनंतर तुकाराम मुंढेंनी कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोड आणि कार्यालयीन शिस्तीचा मुद्दाही उपस्थित केला. एका कर्मचाऱ्याने जीन्स घातल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “तुम्ही जीन्सवर आला आहात. तुम्ही इथे फिरायला आला नाहीत”, असं म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये सभ्य आणि नीटनेटके कपडे परिधान करून येण्याची सूचना केली. स्वत:कडेही जीन्स आणि टी-शर्ट भरपूर असल्याचं सांगत, मात्र कार्यालयात येताना ऑफिसवेअर किंवा डिसेंट ड्रेस असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याशिवाय कार्यालयात येताना शेविंग करून येणं आणि एकूणच नीटनेटकेपणा ठेवणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. नियम पाळले नाहीत तर युनिफॉर्मचा नियम लागू करावा लागेल, अशा इशाराही त्यांनी दिला.

“जरा शिस्त ठेवा. तुम्ही जीन्सवर आला आहात. तुम्ही इथे फिरायला आला नाहीत. माझ्याकडेही जीन्स-टीशर्ट भरपूर आहेत. आता पुन्हा मी वॉर्निगं देणार नाही. आपण ऑफिसमध्ये ऑफिसवेअर घालून यावं. डिसेंट ड्रेस.. एवढीच माझी अपेक्षा आहे. कार्यालयात येताना शेविंग करून यावं, नीटनेटकेपणा असावा. घरी आपण मुलांना सांगतोच ना की, बाहेर जाताना कपडे नीट घालून जा. मग स्वत:च्या बाबतीतही त्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. पाळायचं नसेल तर मग मला युनिफॉर्मचा नियम काढावा लागेल. पण मला ते नको आहे, आपण काय शाळेत जात नाही,” अशा शब्दांत त्यांनी सज्जड दम भरला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us