
श्रावणी सोमवारी कुंडेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांच्या पिकअपवर भीषण अपघात झाला. पाईट गावातील काळूबाई बचत गटातील 10 महिलांचा मृत्यू झाला, तर 29जखमी झाल्या. अपघाताचे कारण चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटणे असल्याचे समजते. पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तर अकरावी प्रवेशाची विशेष फेरी आजपासून सुरु होत आहे. इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील सर्वांसाठी खुली ओपन टू ऑल फेरी सोमवारी संपली आहे. या फेरीत एकूण 3 लाख 24 हजार 761 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केलेले आहेत. विशेष फेरी मंगळवार आणि बुधवार नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी आणि भाग एक मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. पुणे येथील स्वारगेट परिसरात चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. स्वारगेट एसटी स्थानक आणि स्वारगेट पीएमपी बस थांबा परिसरात चोरीच्या घटना घडल्या असून चोरट्याने एकूण एक लाख दहा हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून आरोपी अजूनही फरार आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
मंगळवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात छापे टाकले. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १२०.८४ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. सीबीआयच्या बंगळुरू शाखेत हा खटला दाखल करण्यात आला.
इंडोनेशियाच्या पूर्वेकडील पापुआ भागात आज दुपारी ६.३ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र अबेपुराच्या वायव्येस १९३ किलोमीटर अंतरावर होते. त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही ही दिलासादायक बाब आहे. सुरुवातीच्या अहवालांनुसार, कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीची माहिती नाही. भूकंपानंतर स्थानिक संस्था परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
11 ऑगस्ट 2025 रोजी, कोलकातास्थित अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सहारा ग्रुप कंपन्यांशी संबंधित जमीन आणि शेअर व्यवहारांच्या संदर्भात भारतातील विविध राज्यांमध्ये एकूण 9 ठिकाणी छापे टाकले.
अकोला जिल्हातल्या अकोट तालुक्यातील चोहट्टा व आजूबाजूच्या गावामध्ये अनेक गोरगरीब जनतेला MSEB विज वितरण कंपनी ने 40 ते 50 हजारापर्यंत एका महिन्याचे वीज बिल दिल्यामुळे अनेक कुटुंब मानसिक टेन्शनमध्ये आहेत. ही माहिती वंचित बहुजन आघाडीला मिळाल्यानंतर जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे हे कार्यकर्त्यांसह चोहट्टा येथील MSEB ऑफिस मध्ये जाऊन अव्वाढव्य विज बिल देणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
कोल्हापूर विद्यापीठात गायत्री रेळेकर विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आमची मुलगी आत्महत्या करू शकत नाही. चौकशी झाली पाहिजे असं म्हणत पालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्टेट ऑफ डेटा सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘टेक्नॉलॉजी व्हाईस अॅड़व्हान्स प्रकारचं डेटा सेंटर आहे. येथे चांगल्या पद्धतीच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. देशामध्ये ही कॅपॅब्लिटी उपलब्ध होणं महत्त्वाचं होतं.’
वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे वर्चस्व कायम आहे. पंकजा मुंडे यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. विजयी कौल घेऊन नुतन संचालक मंडळ गोपीनाथ गडाकडे रवाना झाले आहे. विजयी उमेदवार लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होणार आहेत.
हाय कोर्टाच्या निर्णयानुसार मुंबईतील कबूतर खाने महानगरपालिकेकडून बंद करण्यात येत आहे
मात्र दादर कबूतरखाना परिसरात हायकोर्टाचा स्पष्ट आदेश असतानाही कबूतरांना गुपचूप धान्य खायला घालण्याचा प्रकार सुरूच आहे
कबूतर खाना परिसरातील एका इमारतीच्या टेरेसवर २/३ गोणी दाणे कबूतरांसाठी टाकण्यात आले होते
मात्र आता काही वेळा नंतर कबुतरांसाठी टाकलेल्या दाण्यांची गोणी हटवण्यात आली आहे
हाय कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे नियमांचे उल्लंघन होत असल्याने आता कबुतरांना टाकलेले खाद्य हटवण्यात आले आहे
मुंबई पोलीस आयुक्तालयाबाहेर मोठा गोंधळ
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या जनता दरबारादरम्यान गोंधळ
नियोजना अभावी सर्वसामान्यांची मोठी गैरसोय
तासनतास थांबून देखील आयुक्तांची भेट न मिळाल्याने अनेक मुंबईकर नाराज
पोलीस आणि सर्वसामान्यांमध्ये बाचाबाची
शरणू हांडे अपहरण प्रकरणातील सर्व 7 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी 7 पैकी 2 आरोपींची मागितली होती, मात्र न्यायालयाने सातही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मराठी एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांना दादर पोलिसांकडुन नोटिस बजावली आहे. कबुतर खाना आंदोलनात सोशल मीडियावर १३ तारखेला दादर येथे जमण्याचे आवाहन केल्या प्रकरणात ही नोटीस बजावलेली आहे.
बीड – कारागृहातील गांजा प्रकरण भोवले, सतीश उर्फ खोक्या भोसलेची छत्रपती संभाजीनगरच्या हरसुल कारागृहात रवानगी.
बीड-वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव झाला आहे. वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.
ठाणे पोलिसांनी तब्बल 32 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांनी भिवंडी इथून हे 16 किलो अमली पदार्थ जप्त केले. भिवंडी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. भिवंडीतून हे अंमली पदार्थ विविध मार्गे पाठवले जाणार होते. अवजड मालवाहतुकीच्या आड अंमली पदार्थांची तस्करी सुरु होती.
अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच दोन चारचाकी वाहन ताब्यात घेतली आहेत. बीएमडब्ल्यू आणि स्विफ्ट डिझायर अशा दोन चार चाकी वाहने जप् करण्यात आली आहेत. तस्करी करणाऱ्या बीएमडब्ल्यू गाडीमागे ठाणे महापालिकेचा बोध चिन्ह लावण्यात आलं आहे.
अष्टविनायक गणपती श्री क्षेत्र ओझर येथे अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिर गाभाऱ्यात विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे . श्रावण मासातील अंगारकी चतुर्थीचा योग आल्याने लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. देवस्थान ट्रस्ट कडून गणेश कृपा अंगारक महायागाचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगावच्या जामनेरमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या सर्वांना अटक करत कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काही समाजबांधवांनी रुग्णवाहिका रोखली. रस्त्यावर बसून काही समाजबांधवांनी रुग्णवाहिका अडवल्याची घटना शहरात घडली आहे.शवविच्छेदन झाल्यानंतर जळगाव येथून तरुणाचा मृतदेह त्याच्या गावी घेऊन जात असताना जामनेर शहरात रोखण्याचा प्रकार घडला. जळगावच्या जामनेर शहरात दहा ते पंधरा जणांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत VGF म्हणजेच वायब्लीटी गॅप फंडिंगला मंजुरी देण्यात आली आहे. भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश प्राप्त झालेय. वी.जी.एफ ला मान्यता मिळाल्यामुळे विमानसेवा कंपनीला होणारा प्रवासी वाहतुकीचा तोटा राज्य सरकार निधीच्या माध्यमातून भरून देणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान वी.जी.एफ ला मान्यता दिल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले.
ठाणे पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी भिवंडी येथून तब्बल 32 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. भिवंडीतून हे अंमली पदार्थ विविध मार्गे पाठवले जाणार होते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये युवक कॉंग्रेसने रेल रोको आंदोलन केलं आहे. मत चोरीचा आरोप करत त्यांनी हे आंदोलन केलं.
नालासोपारा आणि विरार माजी नगरसेवकांचा भाजपात पक्ष प्रवेश झाला. बहुजन विकास आघाडी मधील माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
माजी नगरसेवक महेश पाटील यांचा भाजप मध्ये पक्ष प्रवेश. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश पार पडला.
माणसं महत्वाची की कबुतरं ? हे समजून घेतलं पाहिजे. लोकांना त्रास होत असेल तर कसली जीवदया आणि भूतदया असं म्हणत कबूतरांपासून जीव धोक्यात येत असेल तर विचार व्हावा असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. कोर्टाने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अकोले दौऱ्यानंतर बाजीराव दराडेंनी राजीनामा दिला आहे. शिवसेना शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख हे पद बाजीराव दराडे यांनी सोडलं
मारुती मेंगाळ प्रवेशानंतर दराडे–मेंगाळ वाद चिघळला असून पक्षातील चुकीच्या पदनियुक्त्यांवर दराडेंची नाराजी आहे. राजीनाम्यानंतर दराडेंच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तब्बल 5 हजार 844 धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. बीम पोर्टलने शेतकऱ्यांना ब्लॉक केल्याने निधी असूनही पणन कार्यालयाकडून बोनस देता येत नाही. ब्लॉक शेतकऱ्यांचा फेरफार व सातबारा तपासल्यानंतर बोनस जमा होणार, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली.
गोंदिया- भजेपारचे सरपंच चंद्रकुमार बहेकार यांना लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. गोंदिया जिल्ह्याचा मान वाढवणारा हा क्षण आहे. महाराष्ट्रातील निवडक 15 सरपंचांमध्ये गोंदियाच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
तब्बल 21 वर्षांनंतर श्रावणात अंगारकी चतुर्थीचा योग जुळून आला आहे. यानिमित्त टिटवाळ्यातील महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा आहेत. पोलीस, महापालिका आणि स्वयंसेवकांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
सोलापूर-पुणे आणि सोलापूर-हैद्राबाद रोडवरील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. जड वाहतूक, विद्यार्थी वाहतूक तसंच शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. येत्या दहा दिवसात रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास गांधीगिरी पद्धतीने खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करणार, असा इशारा नागरिकांनी दिला.
वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागातील ठेका कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरूच आहे. आज सकाळपासून परिवहन सेवेच्या सर्व बस बंद करून चालक, कंडक्टर आणि इतर कर्मचारी असे साडेचारशे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दर महिन्याच्या 7 तारखेला पगार होतो पण अद्यापही पगार न झाल्यामुळे हे आंदोलन सुरू आहे.
बीडच्या परळीतील दि. वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळासाठीची मतदान प्रक्रिया 10 ऑगस्ट रोजी पार पडली होती. यानंतर आज मतमोजणी सुरू झाली असून एकूण 13 संचालकांची यामधून निवड होणार आहे. तर यापूर्वीच चार संचालक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत, यामध्ये माजी खासदार प्रीतम मुंडे यांचा समावेश आहे.
पुण्याच्या खेडमधील कुंडेश्वर अपघातात 10 महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक करण्यात आली. हृषीकेश करंडे असं त्याचं नाव आहे. हृषीकेशवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मी आजही पालकमंत्रिपदावर १०० टक्के ठाम आहे. झेंडावंदन झाल्यानंतर याबद्दल वरिष्ठ निर्णय करतील, असं आम्हाला वाटतंय. झेंडावंदन करणं आणि पालकमंत्रिपद यात फरक आहे. त्यामुळे यात वरिष्ठ जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली.
आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. पहाटे ५ वाजता महागणपतीचा महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. दिवसभर भाविकांनी मोठ्या संख्येने येऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात विद्यार्थी, ग्रामस्थ आणि इतर भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून ६८८ कोटी १६ लाख रुपयांचा दंड अद्याप वसूल झालेला नाही. २०१९ पासून आत्तापर्यंत तब्बल ९८ लाख वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे.या वाढत्या थकबाकीमुळे वाहतूक पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सोलापूर शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असताना, एमआयडीसी पोलिसांनी एका उच्चशिक्षित तरुणाला अटक केली आहे. साहिल महेेेेेेेबूब शहापुरे (वय २२) असं या तरुणाचं नाव असून, तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. त्याने आतापर्यंत शहरातून आठ दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, चोरीच्या दुचाकींचे सुटे भाग काढून तो भंगारवाल्याला विकायचा. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भिवंडीत रात्री भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षाची हत्या करण्यात आलीये, ज्यामुळे खळबळ उडाली आहे.
बियर बार आणि परमिट रूम मिळवण्यासाठी बोगस ग्रामसभा दाखवून ठराव मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड. विभागीय आयुक्तांनी हेराफेरी करणाऱ्या सरपंच पोपट जाधव यांना पदावरून कायमचे बडतर्फ केलेय. मोहोळ तालुक्यातील येणकी ग्रामपंचायतीत हा प्रकार घडलाय
मोठ्यांसह चिमुकले 17 ते 18 जणांना पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा. तीन वर्षाच्या चिमुकलीला डोक्याला चावा घेतल्याने गंभीर जखमी झाली.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सोमवारी उन्हाचा तडाका वाढला मात्र सायंकाळी 7:45 च्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पावसाने हजेरी लावली त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता… पुढील दोन ते तीन दिवसात हवामानात फारसा बदल होणार नसून तापमान स्थिर राहील अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे…
4 सदस्यांचा एक प्रभाग असे 29 प्रभागात 115 नगरसेवक संख्या कायम राहणार… 28 प्रभागात 4 सदस्य तर एक प्रभागात 3 सदस्य असणार… प्रत्येक प्रभागात 35 ते 40 हजार मतदान संख्या असणार आहे… 2011 च्या लोकसंख्येचे निकष ठरवून या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करून, मंजुरीसाठी शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला आहे
सोलापूर जवळील कासेगाव उळे गावाला जोडणारा ओढा ओव्हर फ्लो… कासेगाव उळेगावाला जोडणारा ओढा पाण्याखाली गेल्यामुळे ग्रामस्थांची अडचण…. उळे कासेगाव ग्रामस्थांना पाण्यातून काढावी लागणार वाट… कासेगाव येथील ओढयाचा पूल मंजूर असूनही ग्रामस्थांना पूल मिळत नाही