
मुंबई, ठाणे, पालघरसह ५ जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे पावसाचा जोर वाढलेला दिसत आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सध्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक आणि पुणे घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून उपनगरांत पावसाला सुरुवात झाली असली तरी लोकल आणि रस्ते वाहतूक सध्या सुरळीत आहे. मात्र दुपारनंतर अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे, जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले असून डोंगरी आणि तितुर नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. काढणीवर आलेल्या शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातही तेरणा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावध राहण्याचा इशारा दिला आहे. पुण्याला यलो अलर्ट असला तरी घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग वाढवण्यात आला आहे. तसेच, नाशिकमध्ये गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरीला पुन्हा पूर आला असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव धरनातून 85 हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग
तर खासापुरी व चांदणी धरनातून 32 हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू
तालुक्यातील दुधना,चांदणी सिना नदीला महापूर
परंडा तालुक्यातील सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद
जनजीवन विस्कळित अनेक गावांना पाण्याचा वेढा
करमाळा तालुक्यातील मांगी तलाव ओव्हर फ्लो
मांगी तलाव ओव्हर फ्लो झाल्यानं शेती पाण्याखाली
सात बारा कोरा करण्याची शेतकऱ्यांची मागणी
लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील 16 गावांना देखील पुराचा फटका बसण्याची शक्यता असून, जायकवाडीमधील पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे, रात्रीतून हे पाणी गोदाकाच्या गावामध्ये शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती स्थलांतरित केला जात आहे.
नांदेडमध्ये उद्या बंजारा समाजाचा भव्य मोर्चा
बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची करणारा मागणी
मोर्चाच्या अनुषंगाने नांदेड शहरातील वाहतूक मार्गात करण्यात आले बदल
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी काढले आदेश
धुळे जिल्ह्याला हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणातून 12 हजार क्युसेस पाण्याचा पांजरा नदी पात्रात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पांजरा नदी पात्राच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक धरणं ओव्हरफ्लो झाले असून नद्यांना पूर आला आहे. तर बीड तालुक्यातील बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाले असून बिंदुसरा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कालपासून बीड शहरातून वाहणार्या या नदीला पूर आलेला आहे. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडले आहेत. आता धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदीत 47 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदत केली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केली आहे. नगर शहरातील पूरग्रस्त भागाची निलेश लंके यांनी पाहणी केली, त्यानंतर ही घोषणा केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खडकपूर्णा नदीवरील राहेरी जवळील पुल पाण्याखाली आला असून नदीवरील वाहतूक दोन तासांपासून बंद आहे. जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात जलसाठ्यात वाढ झाल्याने प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी खकपूर्णा नदीला पूर आला असून राहेरी जवळील पुलावरून पाणी वाहत आहे..
येलदरी जलाशयातून दहा दरवाजांद्वारे पाण्याचा विसर्ग, पूर्णा नदी काठांना सतर्कतेचा इशारा, जिंतूर सेनगाव रस्ता बंद करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील येलदरी जलाशयाच्या दहा दरवाजातून पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय. नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरला असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. येलदरी धरण शेजारी असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने जिंतूर सेनगाव वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील डिंबा धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीपात्रामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. घोड नदी पुलावरून पाणी ओलांडले असून गावामधील आजूबाजूच्या गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच गोणवडी गावातील संपूर्ण स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. यामुळे गावांना सतर्कतेचा इशारा शासनाकडून देण्यात आला आहे…
पालघरमध्ये वीज पडून दोनजण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून हाहाकार बघायला मिळतोय.
रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याची घटना गोंदियाच्या देवरी तालुक्यातील धमदीटोला येथे घडली आहे. महिलेला ब्लँकेट आणि मच्छरदाणी सह वाघाने फरफटत नेल्याचे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मुसळधार पावसाने कल्याण तालुक्याला झोडपले असून अनेक नद्यांना पूर आला आहे. खडवली, उल्हास आणि काळू नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. खडवली नदीवरील उड्डाण पूल पाण्याखाली गेल्याने वाहनासाठी पूल पूर्ण बंद केल्याने वाहतूकीचे तीन तेरा वाजले आहेत.
इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद हद्दीतील शिरेवाडी येथील शंकर बुधा भांगरे यांच्या शेतातील असलेल्या घरावर काल मध्यरात्रीच्या सुमारास वीज कोसळली. सुदैवाने ते दुसरीकडे झोपले असल्याने वाचले.
आज जुहू येथील पीव्हीआर सिनेमात भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना दाखवला जाणार आहे, ज्याला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून विरोध केला जात आहे.
मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची संततधार सुरु आहे. सकाळपासून रिमझिम सुरू असलेल्या पावसाचा जोर आता वाढला.
गोदावरी नदीला पाणी वाढल्याने गंगाखेड तालुक्यातील खळीसहित इतर गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थ करत आहे धोक्याचा प्रवास, स्थिती आणखीन बिघडण्याची शक्यता
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीची भयानक स्थिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून कोतवालांपर्यंत कुणीही मुख्यालय सोडता कामा नये, तरीदेखील काही तलाठी मंडळ अधिकारी आदेशाचे पालन न करता सहलीवर एकत्रित गेले असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यात सकाळ पाऊस जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील मोडक सागर, मध्य वैतरणा, तानसा या धरणातून रात्रीपासून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे सूर्या नदीला पूर आला असून नदीचं पात्र तुडुंब भरून वाहत आहे.
मराठवाड्यात झालेल्या पावसाचा प्रशासकीय अहवाल समोर आला आहे. मराठवाड्यात एकाच दिवसात 113% पाऊस पडला. त्यामुळे मराठवाड्यात सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, असं अहवालात म्हटलंय.
अहिल्यानगर शहरातील दातरंगे मळ्यातील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. सीना नदीला आलेल्या पुरात दातरंगे मळा परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. घरात पाणी शिरल्याने सकाळपासून नागरिक उपाशी आहेत. घरातील संसार उपयोगी आणि इतर वस्तू पाण्यात गेल्या आहेत.
अनेक ठिकाणी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिथे पाणी साचू शकेल, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सर्वांत आधी तिथून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आजचा आणि उद्याचा दिवस क्रिटीकल आहे. पुढचे दोन-तीन दिवस अलर्ट मोडवर राहावं लागेल, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
2000 कोटी रुपयांच्या निधीचं वाटप सुरू केलं आहे. ज्याठिकाणी घरांमध्ये पाणी साचलंय, त्यांना तातडीने दहा हजार रुपये देण्याची सोय केली जात आहे. लोकांना ठिकठिकाणी राशनचे किट्स दिले जात आहेत. खालची यंत्रणा योग्य प्रकारे काम करतेय की नाही, हे पाहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या राहण्याची, जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय झाली पाहिजे. काही ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांकरिता चाऱ्याचा पुरवठा तात्काळ करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.
2019 मधील महापुराच्या वेळी आम्ही सर्वोतोपरी मदत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारशी बोलून सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र हे कोणाच्या हातात नसलेलं संकट आहे. शेतकऱ्यांचं समाधान होईल अशी मदत केली जाईल, असं आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत दिलं.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी परिसरातील लामकानावाडी तलाव ओवर फ्लो झाल्याने येथील गावातील घरांमध्ये पाणी शिरले. अनेक वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली असल्याचे नागरिक सांगत आहे. तलाव निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात तलावा द्वारे पाणी ओव्हरफ्लो होत आहे.
नांदेड शहरालगत वाहणारी गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. शहरातील शनि मंदिर पुराच्या पाण्याखाली गेले आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडे 2 लाख 98 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीपात्राच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने नांदेडमध्ये पूर परिस्थिती आहे.
काल झालेल्या हल्ल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. आज पासून लक्ष्मण हाके यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
नाशिक-कल्याण येणारी ही एसटी बस असून डेपोत बसला लाईट नसल्याची माहिती चालकाने दिली होती. मात्र डेपो मॅनेजरने चालकाला ‘काही होणार नाही, बस घेऊन या’ असे फर्मान सोडले.चालक किसन जाधव यांनी ३८ प्रवाशांसह धोकादायक बस कल्याणच्या दिशेने आणली. सर्व प्रवाशांना उतरवून आगारात जात असताना रात्री १ वाजता कल्याण मधील गुरुदेव हॉटेलजवळ अपघात घडला.
कामाच्या बाबतीत आपला कुणी हात धरू शकत नाही कारण मी कामाचा माणूस आहे ही बाब मी छातीठोकपणे सांगतो, असं अजितदादा पवार म्हणाले. मुख्यमंत्री, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याच्या पूरपरिस्थिवर लक्ष ठेऊन आहोत. शिव शाहू फुले आंबेडकर विचारांनी आम्ही पुढे चाललो आहे. सरकार अनेक योजनेतून जनतेला कर्ज देण्याचे कामं करीत आहे, असे ते म्हणाले.
पंढरपूरमध्ये भीमा आणि निरेच्या खोऱ्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे चंद्रभागा नदीला सहाव्यांदा महापूर येण्याची शक्यता आहे. उजनी धरणातून भीमा नदीत 90 हजार तर वीर धरणातून नीरा नदीत 10 हजार क्यूसेक्स सोडलेले पाणी चंद्रभागा नदीत येण्यास सुरुवात झाली आहे. चंद्रभागा नदीपात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांनाही पाण्याने वेढा दिला.चंद्रभागा नदीपात्रावर असलेला ब्रिटिश कालीन दगडी पूल देखील पाण्याखाली गेला.
कल्याण गुरुदेव हॉटेल जवळ बस अंधारात लाईटच्या खांबाला धडकली … सुदैवाने मोठी जीवितहानी टळली..
प्रवाशांचा जीव धोक्यात! नाशिक-कल्याण येणारी ही एसटी बस असून डेपोत बसला लाईट नसल्याची माहिती चालकाने दिली होती.
काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. उल्हास नदीचे पाणी 14 मीटर वरून वाहत असून इशारा पातळी 16.50 मीटर इतकी आहे. उल्हास नदीवरील चौपाटी पाण्याखाली गेलीय. हवामान विभागाने दिलेल्या इशाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आलय. नागरिकांनीही सतर्क राहण्याचा आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतय.
माझ्यावर आतापर्यंत 9 वेळा हल्ले झाले आहेत. माझ्यावर हल्ले करणारे सगळे शरद पवार, रोहित पवार, आणि पवार कुटुंबाशी संबंधित आहेत, लक्ष्मण हाके यांचा दावा..
नदीला पूर आल्याने नगर शहराला जोडणारा कल्याण महामार्ग बंद. शहरातील निफ्टी नाका परिसरात सर्वत्र पाणी, घराणे दुकानांमध्ये शिरलं पाणी. रस्त्यावरून पाणी वाहिल्याने नागरिकांना गाड्या काढण्यासाठी मोठी कसरत
मालाड पूर्व येथे गोळीबार झाला. एक जण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी गोळीबाराची घटना घडली.
मुंबई, ठाणे, पालघरसह एकूण पाच जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे, ज्यामुळे आजपासून राज्यात पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, मरीन ड्राइव्हवर पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक आणि पुणे घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून उपनगरांत पावसाला सुरुवात झाली असली तरी, लोकल आणि रस्ते वाहतूक सध्या सुरळीत आहे. मात्र, दुपारनंतर अतिवृष्टी झाल्यास शहरातील सखल भागांत पाणी साचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे मुंबईकर आज पावसामुळे घरातच थांबले आहेत.
नाशिक जिल्ह्यात काल संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात सध्या ३१ हजार २८३ क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिक आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील गोदावरी काठच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या पावसाळी हंगामात आज सकाळी ६ वाजेपर्यंत नांदूर मधमेश्वर धरणातून एकूण ८०.२५ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात २ लाख ९८ हजार क्युसेक इतक्या प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असून, नदीकाठच्या हजारो हेक्टरवरील शेती पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. नांदेडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याने, प्रशासनाने गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा इशारा दिला आहे.
नाशिकमध्ये गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. गोदावरीची पाणीपातळी वाढल्याने नदीकाठचा महत्त्वाचा असलेला रामकुंड परिसर पुराच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या व्यावसायिकांनी आणि पूजा विधी करणाऱ्या पुरोहितांनी तातडीने आपली दुकाने आणि पूजेचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे दैनंदिन पूजा विधीवरही परिणाम झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आणखी पाऊस सुरू राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बीड जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. यातच, आष्टी तालुक्यातील कांबळी आणि मेहेकरी या नद्यांनाही मोठा पूर आल्याने या नद्यांचे पाणी थेट नांदा गावात शिरले आहे. गावातील अनेक घरांमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. यामुळे नांदा गावातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, पूरग्रस्त परिस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यात तेरणा नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे धाराशिव-लातूर हा मुख्य रस्ता गेल्या तीन दिवसांपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रस्ता बंद असल्याने ग्रामस्थ आपापल्या गावातच अडकून पडले आहेत, ज्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. परिणामी, तेरणा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी शासनाने तातडीने मूलभूत सुविधा पुरवाव्या आणि मदतीचा हात द्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
कल्याण-नगर मार्गावरील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला शहाड उड्डाण पूल दुरुस्ती आणि मजबुतीकरणाच्या कामासाठी तब्बल १५ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील. या निर्णयामुळे मुरबाड-माळशेजमार्गे नगरकडे जाणारी मुख्य वाहतूक तसेच या मार्गाचा वापर करणाऱ्या नोकरदार आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबत निश्चित अधिसूचना जारी केली असून, वाहनधारकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला अति मुसळधार पावसाने झोडपले आहे. पाटणादेवी परिसरातील डोंगरी नदीच्या उगमस्थानावर झालेल्या तुफान पावसामुळे डोंगरी नदीला महापूर आला आहे. अभयारण्यात पूर आल्याने, ऐन नवरात्र उत्सवाच्या काळात चंडिका देवीचे पुरातन मंदिर दर्शनासाठी तात्पुरते बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या डोंगरी आणि तितुर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, पुराचे पाणी शहरातील अनेक सखल भागांत शिरले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने डोंगरी नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.